(पान १ ला ॲंकर)
फोटो : NSK26H33908
नंदुरबार : ई- कचरा संकलन अभियानाचे उद्घाटन करताना योजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे. शेजारी प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, प्राचार्य डॉ. कैलास चौधरी, आशिष वाणी, डॉ. श्रीराम दाऊतखाने.
-----------------
नंदुरबार जिल्ह्यात ई- कचरा मुक्तीचा जागर!
‘नंदुरबार डेव्हलपमेंट समिट’च्या पुढाकारातून अभियानास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २९ : इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर सातत्याने वाढत आहे. त्यातून ई- कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असून, योग्य विल्हेवाट हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘नंदुरबार डेव्हलपमेंट समिट’च्या पुढाकारातून जिल्ह्यात ई- कचरा मुक्तीचा जागर सुरू केला आहे. नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालयापासून जिल्हास्तरीय ई- कचरा संकलन व जनजागृती अभियानाला सुरूवात करण्यात आली असून, या उपक्रमात विद्यार्थ्यांनी घरासह परिसरातील ई- कचरा संकलित करून पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.
अभियानाचा प्रारंभ ‘योजक’ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नंदुरबार डेव्हलपमेंट कौन्सिलच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी डॉ. गजानन डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी यशवंत विद्यालयाचे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना ई- कचरा संकलित करून योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी परिसरातून ई- कचरा गोळा करून ‘नंदुरबार डेव्हलपमेंट समिट’च्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवड्यांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम समजून घेणे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाला आशिष वाणी, डॉ. श्रीराम दाऊतखाने आणि बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास चौधरी यांची उपस्थिती होती. स्मिता दिघे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल भट यांनी आभार मानले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक विलास पाटील, सचिन टिळंगे, रामप्रसाद पाटील, दीपक वाणी, विनोद मराठे, प्रवीण मोरे, सोनिया पाडवी, पूजा रघुवंशी, रश्मी डंडीर आदींनी सहकार्य केले.
--------
विद्यार्थ्यांनी संदेश घराघरांत पोहोचवावा
ई- कचऱ्याचे संकलन, योग्य विल्हेवाट आणि पर्यावरण रक्षण याबाबत या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली. वापरात नसलेले मोबाईल, चार्जर, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे सुटे भाग यांसारख्या वस्तू सामान्य कचऱ्यात न टाकता अधिकृत संकलन व पुनर्प्रक्रिया व्यवस्थेकडे देण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून मिळालेला संदेश घराघरांत पोहोचवावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.