पान एक सेकंड मेन
-----------
नंदुरबारला रासायनिक खतांच्या विक्रीसाठी एफएफएस प्रणाली
विक्रेत्याची निवड करून शेतकऱ्यांना क्युआर कोडद्वारे मिळणार खते
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २२ : जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीसाठी एफएफएस प्रणाली लागू करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खताचे बुकिंग करता येणार आहे. उपलब्ध विक्रेत्याची निवड करून क्युआर कोडद्वारे शेतकरी खत मिळवू शकतील.
एफएफएस प्रणालीमुळे (फेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल) शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी दिली.
शासनातर्फे नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते मिळण्यास अडचण येवू नये म्हणून एफएफएस प्रणाली लागू करण्यात आली. या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲप डाउनलोड करून आधार आधारित किंवा फार्मर आधारीत आयडी लॉगिन करावा लागेल.
प्रणालीत दिसणाऱ्या सर्वे नंबर शेतजमिनींपैकी ज्या जमिनीसाठी खत हवे आहे, ती शेतजमीन निवडावी. त्यात पिकाची माहिती व आवश्यक खताचे प्रमाण नोंदवावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार खत उपलब्ध असलेल्या सोयीच्या विक्रेत्याची निवड करावी. विक्रेता निवडल्यावर मोबाईलवर एक क्युआर कोड तयार होईल. विक्रेत्याकडे जाऊन सदरचा क्युआर दाखवावा. तो स्कॅन करून नियमानुसार खत दिले जाईल. मोबाईलवर तयार झालेला क्युआर कोड ७२ तासांसाठी वैध राहील. त्यानंतर तो कालबाह्य होणार असल्याने मुदतीत प्रक्रीया पूर्ण न केल्यास पुन्हा बुकिंग करावे लागेल.
--------------
प्रणालीचे फायदे
शेतकऱ्याला पिकानुसार व क्षेत्रानुसार आवश्यक तेवढेच खत मिळेल. मुख्य खतासोबत इतर अनावश्यक खत खरेदी करण्याची सक्ती होणार नाही. परिणामी, लिंकींगला आपोआप आळा बसेल. अनधिकृत साठवणूक आणि कृत्रिम टंचाईवर नियंत्रण येऊन काळाबाजार थांबण्यास मदत होईल. कृषी उपयोगाच्या युरियाचा औद्योगिक वापर रोखण्यास मदत होईल. यामुळे युरियाच्या गैरवापरावर नियंत्रण येईल. अधिकृत नोंदींमुळे बनावट किंवा डुप्लिकेट खत विक्रीला चाप बसणार असल्याने बनावट खत विक्रीस बंदी येईल. घरबसल्या खतांची उपलब्धता समजणार असल्याने साठा पाहून बुकिंग करता येणार आहे. परिणामी, दुकानांसमोर रांगा लावाव्या लागणार नाहीत.
शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी एफएफएस प्रणालीचाच वापर करावा. अनधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करू नये. खताची लिंकिंग, जादा दराने विक्री किंवा काळाबाजार आढळल्यास तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी.
शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नंदूरबार