31141
नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना निवेदन देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी.
----------------------
जिल्ह्यातील अवैध धंदे
बंद करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : जिल्ह्यात विविध भागांमध्ये अवैधरीत्या दारूविक्री, जुगार, मटका, अमली पदार्थाची विक्री, नकली दारू, ताडीनिर्मिती व विक्री आदी व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबार जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. सीमावर्ती भाग असल्याने याठिकाणी अवैध दारू व अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. यामुळे नंदुरबार जिल्हा राज्यातील अवैध धंद्याचे केंद्र बनत आहे. यातून शहरात गुन्हेगारी वाढत असून, नुकतीच गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे नंदुरबार शहर जिल्ह्यातील संबंधित विभागामार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास भाजपतर्फे जिल्हाभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
ॲड. सत्यानंद गावित, मोहन खानवानी, पंकज पाठक, डॉ. समिधा नटावदकर, कैलास चौधरी, डॉ. सपना अग्रवाल, पद्मा परदेशी, दिलीप वळवी, सुदाम चौधरी, छोटू चौधरी, राजेश पाडवी उपस्थित होते.