नंदुरबारला बुधवारी
नांदी साहित्य संमेलन
पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : लोकसाहित्य, आदिवासी लोकसंस्कृती, गुर्जर, बंजारा लोकपरंपरा आणि अहिराणी भाषेचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या उद्देशाने नंदुरबारला बुधवारी (ता. ४) नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीजी सार्वजनिक वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य भारतीच्या संयुक्त विद्यमाने संमेलन होत आहे.
कन्यादान मंगल कार्यालयात कै. शालिनीताई नटावदकर नगरीत सकाळी नऊला संमेलनाचे उद्घाटन चैत्राम पवार करतील. संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांची निवड केली आहे. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रदीप निफाडकर उपस्थित राहतील. संमेलनाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभाग कार्यवाह प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्रा. डॉ. वासुदेव वले आणि गणेश आढाव यांची प्रमुख उपस्थिती असेल.
उद्घाटनानंतर लोककला व साहित्य संवर्धन, लोकगीत, अहिराणी गीते, आदिवासी लोकसंस्कृती, काव्यवाचन आणि साहित्यिक विचारमंथन अशा विविध विषयांवर कार्यक्रम होणार आहेत. परिसंवाद, कवी संमेलन आणि समारोप अशा स्वरूपात दिवसभर साहित्यिक मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास नटावदकर, अध्यक्षपदी मसापचे नंदुरबार अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील, तर साहित्य भारतीचे जिल्हाध्यक्ष संदीप चौधरी, रमाकांत पाटील यांच्यासह ऋषिका गावित, दीपक कुलकर्णी, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ, अभिजित खेडकर आदी स्वागत व आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रा. निंबाजीराव बागूल, सुलभा महिरे, सविता पटेल, प्रा. डॉ. माधव कदम, डॉ. विवेक वैद्य, डॉ. श्रीराम दाउतखाने, प्रा. अजित लांडगे, मंगेश उपाशी, राहुल कुलकर्णी, राहुल खेडकर, क्षमा वसईकर, रणजित राजपूत, रोहन नटावदकर आदी परिश्रम घेत आहेत.