(टुडे पान एक ॲन्कर)
फोटो : NSK26H34660
नंदुरबार : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी. शेजारी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी.
-----------------
नंदुरबारकरांना फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसाआड पाणी
आमदार चंद्रकांत रघुवंशी : उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ६ : दुष्काळी परिस्थितीमुळे शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नंदुरबार नगरपालिकेने येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत शहरात दोन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढणार असल्याने मार्चपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पाणीपुरवठा, दुष्काळी परिस्थिती, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तसेच आगामी काळातील पालिकेच्या विविध उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे ही पालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे स्रोत उपलब्ध असले, तरी आगामी उन्हाळ्याचा विचार करून आतापासूनच पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची मागणी आणि वापर वाढत असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. नागरिकांना पाण्याची अडचण भासू नये, या पद्धतीने वेळापत्रक आखण्यात येणार असल्याचे आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट केले.
पाण्याचा अपव्यय टाळावा
दुष्काळात पाण्याचे मोल अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा. घरगुती वापरात पाण्याचा अपव्यय टाळावा. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये. उपलब्ध पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा. पाणी ही अमूल्य संपत्ती असून, आज केलेली बचत भविष्यातील संभाव्य टंचाईपासून शहराला दिलासा देऊ शकते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असेही आमदार रघुवंशी यांनी नमूद केले.
--------
चौकट----
३० लाखांचा खर्च तरी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न कायम
नंदुरबार शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून, नागरिकांच्या सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी पालिकेने यापूर्वी श्वानांच्या नसबंदी प्रक्रियेसाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने हा प्रश्न अद्याप कायम आहे. शहराबाहेरून काही जण कुत्रे आणून शहरातील विविध भागांत सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालिकेला मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा उपद्रव कमी करण्यात अडचणी येत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढे पालिका कठोर उपाययोजना करणार असल्याचे आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट केले. प्राणीप्रेमींनीही याबाबत जबाबदारीची भूमिका घ्यावी. एखाद्या ठिकाणचे कुत्रे दुसऱ्या ठिकाणी किंवा शहरातील रस्त्यांवर आणून सोडू नयेत. प्राण्यांप्रति प्रेम असणे चांगली बाब आहे; मात्र त्यातून इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.