नंदुरबारला २७ नोव्हेंबरला
जिल्हास्तरीय युवा महोत्सव
युवक- युवतींना सादरीकरणाची संधी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन व्हावे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने २७ आणि २८ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असून, इच्छुक युवक- युवतींनी २० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे- निंबाळकर यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत या महोत्सवाचे आयोजन केले असून, केंद्र शासनाचा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी महोत्सवाची संकल्पना ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ अशी आहे. राज्यात यावर्षी राष्ट्रीय युवा महोत्ससाचे रुपांतर ‘विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग’ मध्ये केले आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला, कविता आणि लेखन या स्पर्धा होणार आहेत. समूह लोकनृत्य व समूह लोकगीतासाठी प्रत्येकी ७ कलाकार व ३ सहाय्यक कर्मचारी, पथनाट्यासाठी १० सहभागी कलाकार राहणार आहेत. चित्रकला स्पर्धेसाठी २ आणि कविता लेखन स्पर्धेसाठी १ सहभागी अशी स्पर्धक संख्या निश्चित करण्यात आली आहे.
या स्पर्धांमधून निवड झालेल्या स्पर्धकांना विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला व युवक मंडळे तसेच विविध कला व क्रीडा मंडळांतील इच्छुक कलाकार व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे- निंबाळकर यांनी केले आहे.