नांदुरमध्यमेश्‍वरमधील पाणी पातळी नियंत्रित ठेवावी : वनविभाग

नांदुरमध्यमेश्‍वरमधील पाणी पातळी नियंत्रित ठेवावी : वनविभाग
Published on: 
नांदुरमध्यमेश्‍वरमधील पाणीपातळी नियंत्रित ठेवा वनविभागाचे जलसंपदा विभागाला पत्र; जैवविविधतेला धोका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२३ : रामसर दर्जा असलेल्या नांदुरमध्यमेश्वर जलाशयातील घटत्या पाणी पातळीमुळे पक्ष्यांचा अधिवास आणि जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात धरणातून विसर्ग किंवा आवर्तन सोडण्यापूर्वी वनविभागाशी चर्चा करावी, तसेच ऑक्टोबर ते मार्च या पक्ष्यांच्या अधिवासाच्या महत्त्वाच्या काळात पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी नियोजन करावे, अशी स्पष्ट सूचना वनविभागाने जलसंपदाविभागाला केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी नांदुरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दुष्काळी परिस्थितीत आणि मागणी नसताना अचानक पाणी सोडल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता वनविभागाने पत्राद्वारे जलसंपदा विभागाला जलाशयाच्या पर्यावरणीय महत्त्वाची जाणीव करून दिली आहे. ऑक्टोबर ते मार्चदरम्यान तीनशेहून अधिक पक्षिप्रजाती जलाशय परिसरात वास्तव्यास असतात. त्यांच्या अन्नाची उपलब्धता आणि अधिवास जलाशयातील पाण्यावर अवलंबून असतो. अचानक विसर्ग झाल्यास पाणी पातळी घटून पक्ष्यांच्या अधिवासासह परिसरातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विसर्गाचे नियोजन करताना वनविभागाशी समन्वय साधण्याची गरज पत्रात अधोरेखित करण्यात आली आहे. आवर्तन, ध्वजारोहण आणि शेतीचा तिढा दुष्काळी परिस्थितीत रामतीर्थ येथे ध्वजारोहण सोहळ्यासाठी पाणी सोडण्याचा मुद्दाही प्रशासनासमोर आहे. मात्र, जलाशयातील घटलेली पाणी पातळी आणि पक्ष्यांचा अधिवास लक्षात घेता पाणी सोडण्याबाबत काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. संभाव्य आवर्तनामुळे रामतीर्थातील पाण्याची गरज भागण्यासोबत शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, धार्मिक-सामाजिक गरजा आणि शेतीसाठी पाणी यांचा समतोल साधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. आवर्तनापूर्वी समन्वयाचे निर्देश जलाशयातील सध्याच्या पाणी पातळीची माहिती जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. भविष्यात विसर्गापूर्वी पूर्वचर्चा करावी, आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचवाव्यात आणि जैवविविधतेचे संरक्षण लक्षात घेऊन आवर्तनाचे नियोजन करावे, असे वनविभागाने पत्रात नमूद केले आहे. या सूचनांवर पाटबंधारे विभाग काय कार्यवाही करतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com