नारपार-तान-गिरणा प्रकल्पाला विरोध

नारपार-तान-गिरणा प्रकल्पाला विरोध
Published on: 
पान-१ मेन PLS26B01957 नाशिक ः नारपार- गिरणा प्रकल्पांबाबत गुरुवारी येथे झालेल्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व उपस्थित आमदार नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावित, चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे आदी. -------------- नारपार-तान-गिरणा प्रकल्पाला विरोध ------------ नाशिकमधील बैठकीत खडाजंगी, आज रस्त्यावरची लढाई, राज्याचे पाणी राज्यातच ः जिल्हाधिकारी ​------------ सकाळ वृत्तसेवा नाशिक/ सुरगाणा, ता.२२ ः ​स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता होत असलेल्या नारपार- तान- गिरणा खोरे प्रकल्पाविरोधात सुरगाणा तालुक्यातील शेतकरी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. गुरुवारी (ता.२२) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली महत्त्वाची प्रशासकीय बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. प्रशासनाच्या आश्वासनांवर समाधान न झाल्याने स्थानिक नेत्यांनी व शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.२३) होणाऱ्या आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘ही आमच्या हक्काची आणि रस्त्यावरची लढाई असेल, असा सज्जड इशारा आदिवासी सेवक चिंतामण गावित यांनी दिला आहे. ------------ बैठकीदरम्यान उपस्थितांनी प्रशासकीय कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. स्थानिकांना अंधारात ठेवून अशा प्रकारचे प्रकल्प लादणे खपवून घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. नव्याने प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी १९७२ च्या दुष्काळ काळात मंजुरी मिळालेले आणि अजूनही अपूर्ण राहिलेले बंधारे तातडीने पूर्ण करावेत, अशी ठाम मागणी या बैठकीत लावून धरण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यावर दिलेल्या माहितीने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. बैठकीत चिंतामण गावित म्हणाले,‘ सुरगाणा तालुक्यात आधीच ३२ हून अधिक लहान-मोठे पाटबंधारे आहेत, परंतु त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिकांचे अपरिमित नुकसान करून दुसऱ्यांचा फायदा करून देण्याचा हा प्रयत्न आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. १६-१ गावितांनी सुचविले पर्याय ​माजी आमदार जे. पी. गावित यांनी प्रकल्पाच्या मूळ रचनेत बदल करण्याची मागणी करत प्रशासनासमोर महत्त्वपूर्ण पर्याय ठेवले. सिमेंट काँक्रिट आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून धरणाची साईट लहान करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या अत्यंत सुपीक जमिनी आणि घरे बुडीत क्षेत्रात जाण्यापासून वाचतील. मोटारींच्या साहाय्याने पाणी पूर्व बाजूला वळवावे आणि त्यासाठी तज्ज्ञांमार्फत योग्य तो फेरसर्व्हे केला जावा. सुरगाणा तालुक्यातील २५ ते ३० टक्के जनता दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर करते. ते थांबवण्यासाठी प्रकल्प छोटे आणि स्थानिकांच्या हिताचे असणे अत्यंत गरजेचे आहे. ------------- २०-२ चौकट महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच ः प्रसाद ​प्रकल्पाबाबत निर्माण झालेला तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामस्थांना संयम राखण्याचे व सहकार्याचे आवाहन केले. ‘महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करायचा आहे आणि त्यात सुरगाणा तालुक्याचा खूप मोठा वाटा आहे. अधिकारी वर्ग जेव्हा सर्वेक्षण करायला येईल, तेव्हा त्यांना विरोध करू नका. प्रत्येक ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा घेऊन बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची अचूक यादी तयार करावी. हा प्रकल्प राज्य आणि केंद्रीय जल आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे. पुनर्वसन आणि योग्य नुकसानभरपाईसाठी केंद्रीय कल्याणकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा पूर्ण मदत करतील. महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि संघर्ष टाळावा. आपण या विषयावर सतत संपर्कात राहू. ----------- सर्वपक्षीय नेते व शेतकरी एकत्र ​सुरगाण्याच्या अस्मितेसाठी आणि जमिनीच्या रक्षणासाठी या बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते व शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. बैठकीला आमदार नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावित, आदिवासी नेते चिंतामण गावित, भाजप नेते एन. डी. गावित, शिवसेना (उबाठा) नेते मोहन गांगुर्डे यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यात रमेश थोरात, गोपाळ धूम, सुरेश चौधरी, सीताराम पवार, विजय घांगळे, भिका राऊत, नवसू गायकवाड, रामदास केंगा, माधव पवार, आनंदा झिरवाळ, योगेश ठाकरे, तुकाराम देशमुख, राजेंद्र गावित, युवराज लोखंडे,मधुकर चौथवा, लक्ष्मण गायकवाड, शांताराम चौथवा, अशोक गवळी, तुळशीराम महाले, चंद्रकांत भोये, पुंडलिक घांगळे, मजिद चौधरी, विजय दळवी, सावळिराम महाले यांच्यासह सुरगाणा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. -------------------
Marathi News Esakal
www.esakal.com