OZM26B14920
शिंगवे ः नारीशक्तीचा जागर उपक्रमात सहभागी विद्यार्थिनीनींचा सत्काराप्रसंगी शिक्षकवृंद.
-----------
३६-३
शिंगवेच्या शाळेत रंगला ‘नारीशक्तीचा जागर’
-----------
विद्यार्थिनींनी उलगडला सावित्रीबाईंपासून आनंदीबाईंंपर्यंतचा इतिहास
-----------
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता.२०ः नवरात्रोत्सवानिमित्त शिंगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘जागर नारी शक्तीचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक प्रकाश चव्हाण व सहकारी शिक्षकांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमात विद्यार्थिनींनी भारताच्या इतिहासात आणि विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महान महिलांची व्यक्तिमत्त्वे साकारली. वेशभूषा, प्रभावी संवाद आणि नृत्याच्या माध्यमातून सादर झालेल्या या उपक्रमाने शालेय परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले
पहिल्या दिवशी पहिलीच्या विद्यार्थिनीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. दुसऱ्या दिवशी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला, तिसऱ्या दिवसी दुसरी ‘ब’च्या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची, चौथ्या दिवशी तिसरी अ च्या विद्यार्थिनीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची, पाचव्या दिवशी तिसरीच्या विद्यार्थिनींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची, सहाव्या दिवशी चौथी ‘अ’ आणि ‘ब’ च्या विद्यार्थिनींनी आनंदीबाई जोशी यांची वेशभूषा केली होती.
मुख्याध्यापक प्रकाश चव्हाण व सहकारी शिक्षकांनी मांडलेल्या या कल्पनेला विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींच्या मेहनतीचे, कलागुणांचे आणि सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना आकर्षक ट्रॉफी व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. पहिलीची अनुश्री कटारे, दुसरीची राजवी सानप, दुसरी ‘ब’ मधील आरोही भागवत, तिसरी ‘अ’ मधील शिवण्या डेरले, तिसरी ‘ब’ मधील स्वानंदी शिंदे तसेच चौथीतील ओवी सानप व मधुरा भागवत यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.