पन्नास लाखांचा टप्पा पार करूनही अडथळा
५९४ संस्थांकडून वृक्षगणनेच्या पथकाला प्रवेश नाकारला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : हरित शहराच्या दिशेने वाटचाल करताना नाशिकने ५० लाख वृक्षांचा टप्पा पार केला आहे. असे असतानाही शहरातील तब्बल ५९४ शासकीय आस्थापना, उद्योग आणि खासगी मालमत्ताधारकांनी वृक्षगणनेच्या पथकाला आपल्या हद्दीत प्रवेश नाकारला आहे.
महापालिकेकडून २०१६ मध्ये टेरेकॉन कंपनीमार्फत वृक्षगणना केली होती. त्यानंतर यंदाची गणना मे. ऑरनेट टेक्नॉलॉजी या कंपनीला देण्यात आली आहे. ५० लाख वृक्ष अपेक्षित धरून या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मक्तेदार कंपनीने आतापर्यंत ९५ टक्के काम पूर्ण केले असून, शहरात ५० लाखांहून अधिक वृक्ष आढळून आले आहेत. या गणनेत प्रत्येक वृक्षाची प्रजाती, वय, खोडाची रुंदी, उंची नोंदवून जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. मात्र, गणना अंतिम टप्प्यात असताना सीएनपी, आयएसपी प्रेस, वन विभाग, तोफखाना केंद्र, बोरगड यासारख्या केंद्र सरकारच्या संवेदनशील आस्थापनांसह अनेक खासगी उद्योग आणि संस्थांनी सुरक्षेचे कारण देत पथकाला मज्जाव केला आहे. त्यामुळे या परिसरातील वृक्षगणना रखडली आहे.
------ कोट ------
या संस्थांना गणनेसाठी सहकार्य करण्याबाबत उद्यान विभागाकडून पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. दर सहा वर्षांनी वृक्षगणना बंधनकारक आहे. त्यानुसार नेमलेल्या कंपनीमार्फत काम अंतिम टप्प्यात आहे. ज्या ५९४ संस्थांनी परवानगी नाकारली आहे, त्यांना आम्ही पत्र दिले असून लवकरच ही गणना पूर्ण केली जाईल.
- विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.
------------
परवानगी नाकारलेली विभागनिहाय आकडेवारी
पंचवटी - २००
सिडको - ११२
सातपूर - ९९
पूर्व - ९८
नाशिक रोड- ४९
पश्चिम- ३६
एकूण - ५९४.
------------