नाशिकमध्ये ५३ हजार कोटींची महागुंतवणूक

नाशिकमध्ये ५३ हजार कोटींची महागुंतवणूक
Published on: 
नाशिकमध्ये ५३ हजार कोटींची महागुंतवणूक --- सेमीकंडक्टर, संरक्षण क्षेत्राला बळकटी; ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’मध्ये आठ करार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला ऐतिहासिक गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. राज्य सरकारच्या ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुंबईत झालेल्या सामंजस्य करारांमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल ५३ हजार १२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आठ करार करण्यात आले आहेत. या महागुंतवणुकीतून जिल्ह्यात २४ हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्‍याचा अंदाज उद्योग क्षेत्रातून व्‍यक्‍त होत आहे. या करारामुळे नाशिकची पारंपरिक ऑटोमोबाईल आणि औषधनिर्माण उद्योगांपलीकडे जाऊन हायटेक सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स आणि रिसायकलिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित बहुआयामी जागतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण होणार आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून नाशिकच्‍या औद्योगिक क्षेत्राचा खुंटलेला विकास या करारांनिमित्त गतिमान होणार असल्‍याचे बोलले जाते. दरम्‍यान, या करारांनंतर औद्योगिक क्षेत्रातून स्‍वागत केले जात आहे. पाय-सेमीकॉनचा ४० हजार कोटींचा प्रकल्प नाशिकसाठी प्रस्तावित एकूण गुंतवणुकीत सर्वाधिक मोठा वाटा ‘पाय-सेमीकॉन प्रायव्हेट लिमिटेड’चा आहे. कंपनी सेमीकंडक्टर चिप उत्पादन आणि डेटा सेंटर उभारणीसाठी तब्बल ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. एकूण, गुंतवणुकीच्या सुमारे ७५ टक्के रक्कम या एकाच प्रकल्पातून येत असून, एकट्या या प्रकल्पातून १२ हजार ७५० उच्च कौशल्याधारित रोजगार उपलब्ध होतील. हा प्रकल्प सेमीकंडक्टर क्षेत्राची मदर इंडस्ट्री ठरेल, ज्यामुळे संगणक, मोबाईल आणि वाहनांच्या चिप्स उत्पादनात नाशिक जागतिक नकाशावर झळकणार आहे. ग्रामीण भागात औद्योगिक विस्तार केवळ नाशिक शहरच नव्हे, तर ग्रामीण भागातही या उद्योगांचा विस्तार होणार आहे. चांदवड येथे ‘व्हर्च्युओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स’चा प्रकल्प, तर दिंडोरी तालुक्यातील अक्राळे परिसरात ‘चिरिपाल पॉली फिल्म्स’चा प्रकल्प साकारला जाणार आहे. शहरात जागेची मर्यादा असताना ग्रामीण तालुक्यांत होणाऱ्या या गुंतवणुकीमुळे स्थानिक पुरवठा साखळी, पूरक उद्योग आणि एमएसएमई क्षेत्राला मोठी चालना मिळेल. इन्‍फो प्रस्तावित प्रकल्प व गुंतवणूक तपशील (कंसात संभाव्‍य रोजगार) - पाय-सेमिकॉन प्रा. लि. : ४०,००० कोटी (रोजगार : १२,७५०) - अत्री एनर्जी ट्रान्झिशन प्रा. लि. : ४,००० कोटी (रोजगार : २,५७५) - इंद्रजाल प्रा. लि. : २,४०० कोटी (रोजगार : १,१००) - हायर प्रा. लि. : २,००० कोटी (रोजगार : १,८००) - चिरिपाल पॉली फिल्म्स : १,८५८ कोटी (रोजगार : २,०००) - व्हर्च्युओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स : १,०५० कोटी (रोजगार : १,३००) - रेव्हाल्यू रिसायकलिंग इंडिया : १,०१२ कोटी (रोजगार : ६००) - डालमिया पॉलीप्रो इंडस्ट्रीज : ८०० कोटी (रोजगार : २,०००) एकूण गुंतवणूक : ५३,१२० कोटी. एकूण अपेक्षित रोजगार ः २४,१२५ --- कोट त्रेपन्न हजार कोटींची गुंतवणूक आणि २४ हजारांहून अधिक रोजगार ही नाशिकच्या औद्योगिक इतिहासातील अद्वितीय संधी आहे. संरक्षण, सेमीकंडक्टर व डेटा सेंटरमुळे नाशिकची ओळख आधुनिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून अधिक बळकट होण्यास मदत होईल. - आशिष नहार, अध्यक्ष, ‘निमा’ --- कोट नाशिकला विकासाच्या अग्रभागी नेण्यासाठी ‘आयमा’चे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञान गुंतवणुकीमुळे स्थानिक पूरक व्यवसायांना मोठी संधी मिळेल. औद्योगिक विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे. - राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, ‘आयमा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com