पान-१ साठी
सुनील तायडे ः NNK26A04300
---------------
३०-२
प्रेशरगनमधून खिळा थेट
पोटात शिरल्याने मृत्यू
सिडकोतील घटना ः तपासातून सत्य समजणार
सकाळ वृत्तसेवा
नवीन नाशिक, ता.४ : सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरातील एका बिअर शॉपीमध्ये प्लायवुडला प्रेशर गनने (मॅग्नेटिक गन) खिळे ठोकण्याचे काम सुरू असताना, अचानक उडालेला खिळा काऊंटरवर बसलेल्या युवकाच्या पोटात शिरला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जखमीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून त्यातूनच नेमके कारण समजणार आहे.
....
सुनील अनिल तायडे ( ३९, रा. इन्कमटॅक्स कॉलनी, अंबड लिंक रोड) असे युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी (ता.२) सायंकाळी सातच्या सुमारास सुनील हे लिकर कट्टा दुकानाच्या काऊंटरवर बसलेले होते. त्यावेळी नजिकच प्लायवुडला प्रेशरगनने खिळे ठोकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी प्रेशर गनमधून सुटलेला खिळा अचानक उडाला आणि तो थेट सुनील यांच्या पोटात आरपार शिरल्याने त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. पत्नी दीपाली तायडे यांनी पती सुनील यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांच्यावर उपचार सुरू केले. परंतु रात्री त्यांच्यावर उपचार सुरू असतना डॉ. विशाल करंवदे यांनी तपासून मृत घाेषित केले. अंबड पोलिसात नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक अविनाश नडविनकेरी तपास करीत आहेत.
---------------
१६-१
सीसीटिव्ही फुटेज महत्त्वाचे
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने घटनेच्या नेमक्या स्वरूपाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हा केवळ अपघात होता की यामागे घातपाताची शक्यता आहे यावरील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनास्थळावरील परिस्थिती तपासल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. पोलिस तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे सिडकोतील नागरिकाचे लक्ष लागले आहे. मृत्यूच्या या घटनेमागचे नेमके कारण आता पोलिस तपासातूनच उलगडणार आहे.