घरकुल पूर्णत्वात आदिवासी तालुक्यांची बाजी
नाशिक राज्यात चौथ्या स्थानी; जिल्ह्यात ८५ हजार ४९५ घरांचे बांधकाम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१७ : प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) माध्यमातून जिल्ह्यात ८५ हजार ४९५ घरकुले पूर्ण झाली आहेत. उद्दिष्टपूर्तीच्या बाबतीत आदिवासीबहुल तालुक्यांनी आघाडी घेतली असून, सुरगाणा आणि पेठ तालुके पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत. जिल्ह्यातील एकूण उद्दिष्टाच्या सुमारे ५३ टक्के घरकुले पूर्ण झाली असून, राज्यात नाशिकचा चौथा क्रमांक आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलांसाठी लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०२५-२६ या वर्षासाठी जिल्ह्याला एक लाख ६१ हजार ३४१ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सुमारे दीड लाख लाभार्थ्यांनी पहिला हप्ता स्वीकारला असून, ३ हजार ९८५ लाभार्थी अद्याप त्यापासून वंचित आहेत.
आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये घरकुलांची मागणी अधिक असून, मंजुरीनंतर बांधकामाला गती मिळत आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यांनी उद्दिष्टपूर्तीत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, मालेगाव, नांदगाव आणि येवला तालुक्यांत घरकुलांची पूर्तता ३५ ते ४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास बांधकामांचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे.
७५ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू
जिल्ह्यात अद्याप ७५ हजार ८४० घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यापैकी बहुतांश घरकुले दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील आहेत. त्यामुळे बांधकामासाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ही घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
कोट
घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आदिवासी तालुक्यांमध्ये घरकुलांची मागणी आणि बांधकामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असल्याने तेथील कामांना गती मिळाली.
- प्रतिभा संगमनेरे, प्रभारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक
तालुकानिहाय पूर्ण झालेली घरकुले
सुरगाणा-१०२६२ (७८.७१ टक्के)
पेठ-८२५९ (७५.३४ टक्के)
दिंडोरी-९१७२ (६४.९१ टक्के)
त्र्यंबकेश्वर-८०२१ (५९.८९ टक्के)
नाशिक-१८७२ (५६.२३ टक्के)
देवळा-१८०४
बागलाण-७३५२
चांदवड-५१४८
निफाड-३६१२
इगतपुरी-५७१४
सिन्नर-२६८७
कळवण-६१२२
येवला-४६३०
नांदगाव-४५०४
मालेगाव-६३३६