मुलींच्या स्वागतासाठी बदलतेय समाजाची मानसिकता
नाशिक जिल्ह्यात चार वर्षांत ३५ अनाथ बालिकांना मिळाले हक्काचे पालक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : वंशाचा दिवा मुलगाच हवा, हा हट्ट आता हळूहळू मागे पडू लागला आहे. कधीकाळी मुलासाठी आग्रही असणारा समाज आता मुलीला दत्तक घेऊन तिच्या आयुष्याला नवी दिशा देत आहे. सरकारच्या दत्तक प्रक्रियेत मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याकडे पालकांचा ओढा वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चार वर्षांत ३५ अनाथ बालिकांना हक्काचे पालक मिळाले आहेत. या पालकांच्या प्रेमळ छत्राखाली या मुलींच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भवितव्याची नवी वाट खुली झाली आहे.
‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हातारपणाचा आधार आणि मुलगी म्हणजे दुसऱ्याचे धन’, अशा पारंपरिक समजुतींमध्ये समाज अनेक वर्षे अडकून होता. मात्र, काळानुसार या मानसिकतेत बदल होत गेला. मुलींच्या शिक्षणाला, स्वावलंबनाला आणि त्यांच्या अस्तित्वाला महत्त्व देणारा समाज आता दत्तक प्रक्रियेतही बदलत्या विचारांची प्रचीती देत आहे. तरीही हे चित्र पूर्णपणे बदललेले नाही. तिसरी मुलगी जन्माला आल्याने तिला सोडून देण्याची मानसिकता आजही काही कुटुंबांमध्ये कायम आहे. अनपेक्षित मातृत्वाच्या परिस्थितीतही कुटुंबाच्या दबावामुळे नवजात बाळाला सोडून देण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत अनेक बालिकांना जन्मदात्या कुटुंबाचा आधार मिळत नाही. मात्र, दत्तक प्रक्रियेमुळे त्यांना नव्या कुटुंबात प्रेम, सुरक्षितता आणि हक्काचे घर मिळण्याची संधी निर्माण होत आहे.
मुलींच्या वाट्याला येतेय नव्या घराची ऊब
मुलींना दत्तक घेण्यामागे केवळ अपत्यप्राप्तीचीच इच्छा नसते, तर कुटुंबातील नात्यांना नवा आधार देण्याची भावनाही असते. ठाण्यातील एका दांपत्याने स्वतःला पहिली मुलगी असतानाही सहा वर्षांच्या बालिकेला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे दोन्ही मुलींना एकमेकींची सोबत मिळावी, ही भावना होती.
“आम्हाला पहिली मुलगी आहे. आम्ही दोघेही कामावर गेल्यानंतर घरी आजी-आजोबा असतात. अशा वेळी पहिली मुलगी एकटी पडते. तिला बहिणीची सोबत मिळावी आणि दुसऱ्या मुलीचे संगोपन करण्याचा आनंदही अनुभवता यावा, या विचारातून आम्ही सहा वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले,” असा अनुभव या दांपत्याने सांगितला.
दत्तक प्रक्रियेतून सुरक्षित भविष्याची आशा
मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असताना दत्तक प्रक्रियेतून त्यांना कुटुंबाचा आधार मिळणे ही सकारात्मक बाब आहे. जिल्ह्यात चार वर्षांत ३५ बालिकांना मिळालेले हक्काचे पालक हे या बदलाचे महत्त्वाचे उदाहरण आहे. समाजातील प्रत्येक बालिकेला सुरक्षित बालपण, प्रेम आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी अशा निर्णयांचे महत्त्व अधोरेखित होते.
कोट
मुलाची अपेक्षा आणि मुलीबाबतची नकारात्मक मानसिकता यामुळे अनेक बालिका अनाथ होतात. मात्र, मुलींना दत्तक घेऊन त्यांना हक्काचे घर आणि सुरक्षित भविष्य देण्याकडे पालकांचा कल वाढत आहे.
- वंदना पाटील
---
दत्तक गेलेली बालक
वर्ष..........मुली..........मुले
२०२२-२३..........०८..........०८
२०२३-२४..........०७..........०७
२०२४-२५..........१३..........०९
२०२५-२६..........०७..........०७
एकूण..........३५..........३१