नाशिक-अहमदाबाद बस अपघातात दोन ठार
सहा जखमी; धुक्यामुळे दृश्यमानता खालावल्याने झाला अपघात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : पेठ तालुक्यातील करंजाळीजवळ मंगळवारी (ता.६) बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. तर सहा जण जखमी झाले. पेठ तालुका परिसरात निर्माण झालेले ढगाळ व धुक्याचे वातावरण आणि त्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता खालावल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासकीय यंत्रणेतर्फे वर्तविला आहे.
या अपघातातील जखमींपैकी दोन गंभीर रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातात मृत झालेल्यांमध्ये राहूल ओझा आणि महेंद्र पाल या दोघांचा समावेश आहे. उर्वरित पाच व्यक्तींपैकी चौघांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर एका प्रवाशाची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना कोणतीही दुखापत किंवा इजा झालेली नसल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षास या अपघाताची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने चार रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. पेठचे तहसीलदार शिवाजी गायकवाड, पोलिस अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. व नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.