नाशिक, त्र्यंबकमध्ये ३०, ३१ ला मद्यविक्रीला बंदी
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : सिंहस्थ कुंभमेळाअंतर्गत पंचवटीत रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे ३१ तारखेला सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक महापालिका तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व देशी-विदेशी मद्यविक्री दुकाने ३० व ३१ तारखेला दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी, महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार (ता. ३०) आणि शनिवार (ता. ३१) या दोन दिवसांसाठी मद्यविक्री बंदी लागू राहणार आहे. या आदेशानुसार संबंधित क्षेत्रातील देशी दारूची दुकाने, विदेशी मद्यविक्रीची दुकाने तसेच विविध परवान्यांच्या श्रेणीतील मद्यविक्री केंद्रे बंद ठेवावी लागणार आहेत. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित सर्व परवानाधारकांनी आदेशाचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ५४ व ५६ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.