नाशिकमध्ये पोलिसांचे ‘अँटी टेरर ड्राईव्ह’
--------------
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लॉज, भाडेकरू, कॅफे, धार्मिकस्थळी तपासणीसत्र
-------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यात आली आहेत. पोलिस आयुक्तालयातर्फे विशेष ‘अँटी टेरर ड्राईव्ह’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील १४ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत भाडेकरू तपासणी, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, सायबर कॅफे आणि संवेदनशील ठिकाणी धडक तपासणी मोहीम राबवून संशयितांवर बारीक नजर ठेवली जात आहे.
------------
कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ आॅक्टोबरला राष्ट्रपती मुर्मू या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिगण उपस्थित राहतील. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेशाखेकडून शहरात दहशतवाद विरोधी मोहीम (अँटी टेरर ड्राईव्ह) हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिस ठाणेनिहाय छापासत्र राबविण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील भाडेकरूंची कसून तपासणी केली जात आहे. हॉटेल्स, लॉज व धर्मशाळांची झाडाझडती घेऊन तेथील मुक्कामी असलेल्या नागरिकांच्या नोंदी तपासण्यात येत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांना पोलिसांनी भेटी देऊन नियमित सुरक्षेचा आढावाही घेतला जात आहे. शहरातील १४ पोलिस ठाण्यांसह शहर गुन्हशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखांची पथके, अंमलीपदार्थ विरोधी पथक, गुंडाविराेधी पथक आणि विशेष शाखेची गोपनीय पथकांकडून शहरावर वॉच ठेवला जात आहे.
१६-१
सायबर, मोबाईल विक्रेते रडारवर
शहरातील सायबर कॅफे आणि मोबाईल, सीमकार्ड विक्रेत्यांकडेही कसून चौकशी केली जात आहे. प्रॉपर्टी एजंटस्कडे मालमत्तेसंदर्भात होणाऱ्या चौकशीचीही माहिती घेतली जात आहे. शहरातील बेपत्ता व्यक्तींच्याही नोंदी तपासल्या जात आहेत. सुरक्षिततेच्या अनुषंगाने शहरातील मॉल्स, मल्टिप्लेक्स यासह जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री व्यावसायिकांकडील नोंदीसह चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. अंमली पदार्थविरोधी पथकही करडी नजर ठेवून आहेत.
१६-१
बांग्लादेशींवर कडक नजर
गेल्या आठवड्यात शहरात आणखी दोन बांगलादेशी नागरिकांना शहर पोलिसांनी अटक केली. वर्षभरात विनापरवाना भारतात दाखल होऊन नाशिकमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक शहरात मिळून आले. आगामी कुंभमेळा आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून शहरात परदेशी नागरिकांची कसून चौकशी केली जात असतानाच, विनापरवाना परदेशी नागरिकांचाही कसून शोध घेतला जात आहे.
....