फोटो H31374
नाशिक : उपनगर परिसरातील विधीसंघर्षित बालकांकडून जप्त केलेले कोयते व मोपेड. समवेत शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक.
--
दहशत पसरविणारे ताब्यात;
तिघेही संशयित विधीसंघर्षित
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगून दहशत माजविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने उपनगर ठाण्याच्या हद्दीतील आम्रपाली कॅनल रोड परिसरात कोयते बाळगून दहशत माजवणाऱ्या तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते, एक मोपेड असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परिमंडळ दोनच्या हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त घालत असताना गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक गुलाब सोनार, अंमलदार संतोष सुपेकर यांना गोपनीय माहिती मिळाली. उपनगरच्या आम्रपाली कॅनल रोड परिसरात तिघे मोपेडवर आले असून, त्यांच्याकडे कोयते असल्याची खबर मिळाली. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आम्रपाली झोपडपट्टी परिसरात सापळा रचला. संशयित तिघांना पोलिसांनी घेराव घालून जागीच पकडले. चौकशीदरम्यान तिघेही विधीसंघर्षित बालक असल्याचे समोर आले. पालकांच्या समक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, दोघांच्या कमरेला खोसलेले दोन धारदार लोखंडी कोयते आढळून आले. याप्रकरणी उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दानेचे प्रभारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत मोहिते, उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, हवालदार प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, मनोज शिंदे व संतोष सुपेकर यांच्या पथकाने केली आहे.