एन्कर
रामतीर्थावरील कावळा की जटायूचे प्रतीक असलेले गिधाड?
१० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पक्षी सप्ताहात नागरिकांना निवडीची संधी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी नाते सांगणारा कावळा की पर्यावरणाच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिधाड, यापैकी नाशिकचे पक्षी मानचिन्ह कोणते ठरणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षी सप्ताहानिमित्त ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत नागरिकांना या दोन पक्ष्यांपैकी एकाची निवड करण्याची संधी मिळणार आहे. मतदानासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नाशिकचे धार्मिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांची निवड करण्यात आली आहे. रामतीर्थावर होणाऱ्या दशक्रिया विधींमध्ये कावळ्याला अन्न अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे कावळ्याचे नाशिकच्या धार्मिक जीवनाशी विशेष नाते आहे. दुसरीकडे, रामायणातील जटायूच्या कथेमुळे गिधाडाला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील टाकेद येथील जटायू मंदिर आणि अंजनेरी परिसरातील गिधाडांचा अधिवास यामुळे या पक्ष्याचे स्थान अधोरेखित होते.
कावळा आणि गिधाड हे दोन्ही पक्षी पर्यावरणीय समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः गिधाडे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. गिधाडांची घटती संख्या लक्षात घेता त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याची गरजही या उपक्रमातून अधोरेखित होणार आहे.
महापालिका, जिल्हा प्रशासन, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि उन्नत नाशिक अभियान यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा उपलब्ध लिंकद्वारे नागरिकांना मतदान करता येईल. एका व्यक्तीला एकदाच मतदान करता येणार असून, नागरिकांच्या सहभागातून नाशिकचे पक्षी मानचिन्ह निश्चित केले जाणार आहे.