मत नोंदविण्याची आज अखेरची मुदत
पक्षी मानचिन्ह निवडीला बहुसंख्य नागरिकांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : नाशिकचे पक्षी मानचिन्ह म्हणून कावळा की गिधाड यापैकी कोणत्या पक्ष्याची निवड करावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या लोकसहभागाच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन हजार ३०० हून अधिक नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदविला आहे. पक्षी संवर्धनासारख्या तुलनेने दुर्लक्षित विषयाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात या उपक्रमाला यश आले आहे.
आपलं पर्यावरण संस्थेच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी सुमारे दीड महिन्याची पूर्वतयारी करण्यात आली. निसर्गप्रेमी, पर्यावरण अभ्यासक आणि नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निवड प्रक्रियेच्या क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर महापौरांनी पहिले मतदान करून प्रक्रियेचा प्रारंभ केला.
नाशिकच्या भौगोलिक, पर्यावरणीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा विचार करून कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत इतर पक्ष्यांचे महत्त्व कमी लेखण्याचा हेतू नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. शासकीय कार्यक्रम, प्रशासकीय कामकाज, शाळा- महाविद्यालयांच्या परीक्षा आणि दिवाळीमुळे व्यापक शासकीय सहभागाला मर्यादा आल्या. तसेच क्यूआर कोड स्कॅन करणे आणि ऑनलाइन मतदान करताना काही नागरिकांना तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला. मात्र, उपक्रमाची माहिती मोठ्या प्रमाणावर पोहोचली. पक्ष्यांविषयी जिज्ञासा निर्माण करणे आणि संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेचे शेखर गायकवाड यांनी सांगितले.