टूडे साठी
------------
जन्म-मृत्यू दाखल्यांच्या फेरफार
प्रकरणात ६९० नोंदी संशयास्पद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चौकशीत मोठी बाब समोर आली आहे. आतापर्यंत तपासलेल्या १५ हजार ६८९ दाखल्यांपैकी १४ हजार २६९ नोंदी योग्य आढळल्या तरी ६९० नोंदींमध्ये फेरफार झाल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. अद्याप ७३० दाखल्यांची तपासणी बाकी आहे.
केंद्र व राज्य सरकारने २०१६ मध्ये जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन देण्यासाठी सीआरएस प्रणाली लागू केली होती. मात्र नाशिक महापालिकेत ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित न झाल्याने ऑफलाइन दाखल्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर त्यांनी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका वैद्यकीय विभागाने विभागीय स्तरावर सहा चौकशी समिती स्थापन केली.
समिती मार्फत २०१६ पूर्वीच्या दाखल्यांची तपासणी केली जात आहे. महापालिकेच्या चौकशीत आतापर्यंत १४ हजार २६९ नोंदींमध्ये कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी ६९० नोंदींमधील फेरफारामुळे संशय बळावला आहे. उर्वरित ७३० दाखल्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल आणि पुढील कारवाईचे चित्र स्पष्ट होणार आहे.