टूडे मेन साठी
फोटो : H34472, H34474
------------------
दहा स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचे वर्तुळ पूर्ण
भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी; संघटनेत काम करणाऱ्यांचा बोलबाला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : नऊ महिन्यांपासून रखडलेल्या महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. महापालिका आयुक्तांकडे भाजपचे सहा, शिवसेनेचे दोन व शिवसेना (उबाठा) दोन असे एकूण दहा स्वीकृत सदस्य नियुक्तीचे प्रस्ताव दाखल झाले. भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी देताना संघटनेतील काम करणाऱ्यांना संधी देण्यात आली. भाजपसोबत एका जागेचा जुगाड करणाऱ्या काँग्रेसचा तांत्रिक कारणामुळे प्रयत्न फसला.
उच्च न्यायालयाने सहा आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेला वेग आला. स्वीकृत सदस्य नियुक्तीची मुदत सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे ४ नोव्हेंबरपर्यंत वाढविली. संख्याबळानुसार भाजपला ६, शिवसेनेला २ आणि उबाठा-काँग्रेस आघाडीला २ जागांचा कोटा मिळाला आहे. त्यानुसार १० स्वीकृत नगरसेवकपदांसाठी अर्ज सादर करण्यात आले. शिवसेनेतर्फे (उबाठा) हेमंतकुमार गायकवाड व बाबासाहेब गायकवाड यांनी आदल्या दिवशी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे यांना संधी देण्यात आली. दोघांचे प्रस्ताव सादर करतेवेळी महापालिकेचे गटनेते अजय बोरस्ते, संपर्क नेते विजय करंजकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नावांवर एकमत होत नव्हते. अखेरच्या क्षणी सहा नावांचे प्रस्ताव महापौर हिमगौरी आडके व गटनेते ॲड. श्याम बडोदे यांनी सादर केले. नावांवर शिक्कामोर्तब करण्याचा खेळ प्रस्ताव दाखल करण्यापर्यंत सुरु होता. अखेरच्या क्षणी प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, नामको बॅंकेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रक, माजी नगरसेवक संदीप लेनकर, भाजपच्या प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहीत संघाचे अध्यक्ष व भाजपचे तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी व भाजपचे जुने पदाधिकारी रामहरी संभेराव यांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यामार्फत दोन दिवसात प्रस्तावांची छाननी होईल. त्यानंतर येत्या महासभेत महापौरांकडून स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
----------चौकट-
काँग्रेसचे हात दाखवून अवलक्षण
स्वीकृतसाठी शिवसेना (उबाठा) सोबत गटनोंदणी केलेल्या काँग्रेसला दोनपैकी एक पद हवे होते. परंतु उबाठाकडून नकार देताना दोघांचे स्वीकृतीसाठी अर्जदेखील दाखल करण्यात आल्यानंतर कॉंग्रेसकडून थेट भाजप सोबत जाण्याची तयारी केली. विभागिय आयुक्तांकडे उबाठा व काँग्रेसने एकत्रित गटनोंदणी कल्याने उबाठा-काँग्रेसच्या १८ सदस्यांच्या शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे. भाजप सोबत जाण्यासाठी एक तृतीयांश म्हणजे बारा नगरसेवकांचा एक स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली झाल्या. काँग्रेसचे तीन तर उबाठाचे नऊ नगरसेवक फोडण्याची तयारी करण्यात आली होती. यातून भाजपला सहा व्यतिरिक्त एक स्वीकृत नगरसेवकपद अतिरिक्त देवून उबाठावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता. परंतु देशभरात भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष तीव्र असताना व भाजपच्या मतदारांमध्ये काँग्रेससोबत युती करण्याचा नकारात्मक संदेश जाण्याच्या भिती व तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र गटाची शक्यता दिसतं नसल्याने प्रयत्न निष्फळ ठरल्याचे बोलले जात आहे.
------------चौकट
दोन पत्रकारांना संधी
स्वीकृत सदस्यांमध्ये भाजपकडून अजित चव्हाण व उबाठाकडून बाबासाहेब गायकवाड यांना संधी दिल्याने मनपाच्या सभागृहात दोन माध्यम प्रतिनिधींची एन्ट्री झाली आहे. चव्हाण चॅनेलवर निवेदक होते, तर गायकवाड अनेक वर्षांपासून मुद्रित माध्यमात प्रतिनिधी म्हणून काम पाहतं आहे. चव्हाण यांच्या बाबतीत मुंबई पॅटर्न अमलात आला आहे. मुंबई महापालिकेत प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन नगरसेवक आहे.
-----------------चौकट
वर्षभरासाठी नियुक्ती
स्वीकृत सदस्य नियुक्ती करताना सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागली. विशेष करून भाजप व शिवसेनेत नाराजीचा स्फोट होण्याच्या धास्तीने दोन्ही पक्षांकडून एक वर्षांसाठी स्वीकृत सदस्य नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यापूर्वी सदस्यांकडून राजीनामे लिहून घेतले. त्यातून पक्षांमधील धुसफूस तूर्त थांबविण्यात यश आले असले तरी जोपर्यंत स्वीकृत सदस्य स्वतःहून आयुक्तांकडे राजीनामे सादर करतं नाही, तोपर्यंत राजीनामे ग्राह्य धरला जात नसल्याने वर्षपुर्तीनंतर स्वीकृत वरून वाद होण्याची शक्यता आहे.
---------------चौकट
असे आहेत स्वीकृत नगरसेवक
- भाजप : अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, चंद्रशेखर पंचाक्षरी.
- शिवसेना (उबाठा) : हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड.
- शिवसेना (शिंदे गट) : चंद्रकांत लवटे, बाबूराव आढाव.
-----------------------------