कारची काच फोडून
२० लाखांवर डल्ला
राका कॉलनीतील घटना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : राका कॉलनीतील उद्यानासमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील २० लाखांची रोकड हातोहात लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय ठेकेदार अंबादास पोपट घुगे (रा. जेल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. १७) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास घुगे यांनी पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातून मित्राकडून २० लाखांची रोकड घेतली आणि ते त्यांच्या कारमधून (एमएच १५ सीटी २८८८) दोन मित्रांसह राका कॉलनीतील राका उद्यानासमोर आले. सेंट्रल बँकेजवळ चहा पिण्यासाठी त्यांनी कार राका कॉलनीत पार्क केली आणि चहा पिण्यासाठी गेले. या दरम्यान अज्ञात दोन संशयितांनी त्यांच्या कारची डाव्या बाजूची काच फोडली आणि कारच्या सीटवरील २० लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. घुगे हे चहा पिऊन परत आले असता, कारची काच फोडलेली होती आणि सीटवरील पैशांची बॅगही लंपास झाली होती. त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलिसांना खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन चोरटे निदर्शनास आले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.