
नाशिक सिटी बस विस्ताराला ‘एमएनजीएल’चा खोडा
नाशिक : सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळावी व पर्यावरणपूरक शहराची प्रतिमा कायम राहावी, या उद्देशाने महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला प्रतिसाद मिळत असताना सीएनजी गॅस उपलब्ध होत नसल्याने शहर बससेवेचा विस्ताराला ब्रेक लागला आहे.
महापालिकेकडून गेल्या वर्षी जुलै महिन्यात शहर बससेवेला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये ५१ बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष करून ग्रामीण भागांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्याने बससेवेबाबतचा महापालिकेचा आत्मविश्वास दुणावला. आत्तापर्यंत ५१ हजार दररोजचे प्रवासी सिटी बसमधून प्रवास करत आहे. दैनंदिन उत्पन्नदेखील सोळा लाखांच्या वर पोचले आहे. बससेवेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने सिटीलींक कंपनीने बससेवेचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. सध्या १४८ बस सीएनजीवर चालतात. अजून महापालिकेला शहरामध्ये १०२ सीएनजी बस रस्त्यावर उतारवयाच्या आहे. परंतु, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून प्रकल्पाला गती मिळत नसल्याने सीएनजीचा तुटवडा भासत आहे. सीएनजी उपलब्ध होत नसल्याने महापालिकेचा बस विस्तार रखडला आहे.
'सीएनजी’चा अपुरा पुरवठा
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व महापालिकेमध्ये संयुक्त करार झाला आहे. त्यानुसार एक रुपया कमी दराने महापालिकेच्या सिटी बससाठी सीएनजी गॅस पुरवला जातो. सध्या सीएनजी गॅस सिलिंडर स्वरूपात उपलब्ध होत आहे. त्यावर ९८ सिटी बस धावतात. अजून पन्नास सीएनजी बस महापालिकेला रस्त्यावर आणायच्या आहे. परंतु, सीएनजी पुरवठा होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Web Title: Nashik City Bus Service Expansion Break Mngl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..