नाशिक: ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ या उक्तीलाच शहरातील राजकीय नेते, शिक्षणसम्राटांसह हौशा-नवश्यांकडून शहरातील दिशादर्शक कमानींवर फलकबाजी करीत हरताळ फासला जातो आहे. अनधिकृतरीत्या फलकबाजीमुळे कमानी झाकल्या जाऊन शहराच्या विद्रुपीकरणात भर घातली जात आहे. काही ठिकाणी धोकादायकरीत्या फलक लावण्यात आले आहेत; परंतु याकडे महापालिका व पोलिस प्रशासनाकडून सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याचे फलकबाजांची मुजोरी वाढली; तर शहरात पर्यटनानिमित्त येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना दिशादर्शक कमानीवरील होर्डिंगमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.