मेन
सीएनजीसाठी वेटिंग संपणार; जिल्ह्यात २१ नवीन पंप
सिंहस्थ कुंभमेळ्यात ५० टक्के भाविक खासगी वाहनांनी येण्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून खासगी वाहनाने येणाऱ्या भाविकांना अखंडित सीएनजी पुरवठ्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यात २१ ठिकाणी नव्याने सीएनजी पंप उभारण्यात येणार आहे. इंधन पुरवठादार कंपन्यांकडून त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने सिंहस्थ पर्वास प्रारंभ होणार आहे. यंदाच्या कुंभपर्वाचा कालावधी २२ महिन्यांचा आहे. देश- विदेशातून १२ कोटी भाविक, पर्यटक तसेच साधू महंत सिंहस्थात हजेरी लावतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन केले जात आहे. रेल्वे, विमानसेवा तसेच खासगी वाहने अशा तीन टप्यात भाविक जिल्ह्यात येतील. त्यामध्ये खासगी वाहनांनी साधारणत: ५० टक्के भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये बस, एसटी तसेच मोठ्या वाहनांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त टॅक्सी, कार व स्थानिक स्तरावर रिक्षांसह व्यावसायिक वाहनांची संख्येतही भर पडण्याची शक्यता आहे. परिणामी सध्याच्या सीएनजी पंपावर अतिरिक्त ताण वाढणार आहे. जिल्ह्याभरात सद्यस्थितीत सीएनजीचे २३ पंप कार्यरत आहेत. त्यामधील आठ पंप ऑनलाइन पद्धतीचे असून ऊर्वरित पंप ऑफलाइन पद्धतीने चालविले जातात. मात्र, वाहनांची संख्या, गॅसची मागणी तसेच पुरवठ्यातील विलंबामुळे वाहनधारकांना पंपावर तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे पेट्रोल -डिझेलसह सीएनजीच्या पुरवठ्यासाठी नव्याने २१ पंप उभारण्यात येणार आहेत. या पंपामुळे येणाऱ्या भाविकांना वेळेत सीनएजी उपलब्ध होण्यास मदत मिळेल.
---चौकट
वितरणासाठी जाळे
जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या पंपांना नियमित व सुरळीतपणे सीएनजी पुरवठ्यासाठी गॅस पाइपलाइन, वाहतूक व्यवस्था, वितरण क्षमता आणि ऑनलाइन पुरवठा यंत्रणांचाही विस्तार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजी स्टेशनशी संबंधित विविध कामांसाठी निविदा प्रक्रियेची तयारी सुरु केल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे पंपांची संख्या वाढविण्यासह सीएनजी वितरणाचे जाळे मजबूत होण्यास हातभार लागणार आहे.
---
गॅस सिलिंडरसाठी नियोजन
*सिंहस्थ कालावधीत एलपीजी सिलिंडरच्या मागणीत वाढ होणार आहे.
* पुरवठा विभागाने त्या दृष्टीने गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांना सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करावा, अशा सूचना केल्या आहेत.
* मागणीच्या तुलनेत पुरवठा, पुरवठ्यासाठी मार्ग व आपत्कालीन परिस्थितीत करायच्या उपाययोजनांवर आराखड्यात भर दिला जाणार आहे.
---
तात्पुरते रेशन दुकाने
सिंहस्थ कालावधीत आखाडे व खालसे तसेच धार्मिक आणि सेवाभावी संस्थांकडून लंगर चालविले जातात. रेशन व्यवस्थेतंर्गत सरकार या सर्व संस्थांना धान्य तसेच अन्य साहित्याचा पुरवठा करते. त्या दृष्टीने साधुग्राम तसेच प्रमुख ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रेशन दुकाने उभारण्यासंदर्भात पुरवठा विभाग काम करते आहेत. तसेच या रेशन दुकानांमधून तात्पुरते रेशनकार्ड वितरणासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्राथमिक तयारी केली जात आहे.
---------------