नाशिककरांना थंडीची चाहूल
---
पाऱ्यात घट; निफाडला पारा १२.३ अंशांवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : दिवाळीनंतर नाशिकमध्ये आता थंडीची चाहूल लागली आहे. दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा पारा १३.९ अंशांवर स्थिरावला असून, वाढत्या थंडीच्या कडाक्याने नागरिक गारठून गेले आहेत; तर द्राक्षपंढरी निफाडमध्येही तापमानाचा पारा १२.३ अंशांपर्यंत खालावल्याने गोदाकाठाला हुडहुडी भरली.
दिवाळीचा सण उत्साहात साजरा केल्यावर नाशिककरांना आता थंडीचे वेध लागले आहेत. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे गेल्या आठवडाभरापासून तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत आहे. परिणामी, वातावरणात गारठा जाणवत आहे. विशेष करून रात्रीच्या वेळी तसेच पहाटे थंड वाऱ्यांचा वेग अधिक प्रमाणात असल्याने नाशिककर गारठून जात आहेत. पहाटेच्या वेळी पडणाऱ्या धुक्यामुळे शहर परिसर हरवून जात आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपडे कपाटातून बाहेर काढले आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती गर्दी होताना नजरेस पडत आहे. शहरात शुक्रवारी (ता. १३) किमान तापमानाचा पारा १३.९ अंशांवर स्थिरावला.
द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. तालुक्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने चढ-उतार होत असली, तरी थंडीचा कडाका कायम आहे. परिणामी, तालुकावीसयांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, मध्य भारतात सध्या कोरडे हवामान आहे. अशा परिस्थितीत उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांना अडथळा नसल्याने येत्या काळात थंडीचा कडाका अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविला जात आहे.
जिल्ह्यात थंडीची लाट
जिल्ह्यातील मालेगाव, चांदवड, दिंडोरी या पट्ट्यासह इतरही तालुक्यांत थंडीचा जोर जाणवत आहे. दरम्यान, यंदा पावसाअभावी थंडीचा जोर कमी राहील, असा अंदाज असतानाच तापमानात सातत्याने होणारी घसरण होत आहे. रब्बी हंगामाच्या दृष्टीने ही दिलासादायक आहे. मात्र, द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखीत वाढ होईल.
नाशिकचे किमान तापमान
तारीख...........अंश
१३...........१३.९
१२...........१३.९
११...........१४.२
१०...........१४.८
०९...........१४.३
०८...........१४.२
०७...........१५.०