महाबळेश्वरपेक्षा नाशिकमध्ये जास्त गारठा
---
किमान तापमान १३.४ अंश, निफाडचे ११.५ अंशांवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ ः ऋतुमानात बदल होऊन वातावरणात गारठ्याचे प्रमाण वाढत आहे. शनिवारी (ता. १४) नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. या दिवशी नाशिकचे किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस, तर निफाडचे तापमान ११.५ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा जास्त गारवा सध्या नाशिकमध्ये जाणवतो.
शनिवारी महाबळेश्वरचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. राज्यात नीचांकी किमान तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली असून, येथील पारा १२.४ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. सायंकाळच्या वेळी वातावरणात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवते. त्यामुळे आतापासून हिवाळी कपडे काढण्याची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक गारठा निफाड तालुक्यात नोंदविला जातो. यंदाच्या हंगामात निफाडमध्ये गेल्या बुधवारी (ता. ११) हंगामातील नीचांकी तापमान १०.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र येथील पारा किरकोळ प्रमाणात वाढला होता. शनिवारी निफाडचे किमान तापमान ११.५ अंश सेल्सिअस नोंदविले. असे असले तरी डिसेंबर उजाडण्यापूर्वी पारा दहा अंशांपेक्षा खाली घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
नाशिकमध्ये पाऱ्याची घसरण सुरूच असून, शनिवारी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. एकीकडे किमान तापमानात घट झाली असताना, दुसरीकडे कमाल तापमानात मात्र मोठी वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत कमाल तापमान ३० अंशांपेक्षा जास्तवर पोहोचले असून, शनिवारी ३१.९ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसाच्या वेळी कडक ऊन आणि सायंकाळनंतर वातावरणात गारठा जाणवत असल्याने अशा मिश्र वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.