मेन
दत्तनगरात पन्नासहून अधिक कूपनलिका होणार सील
महापालिकेकडून दररोज ५ लाख लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा; घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर परिसरात रासायनिक सांडपाण्यामुळे बोअरवेलचे पाणी दूषित होऊन १०९ हून अधिक नागरिकांना त्वचारोग जडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवत परिसरातील ५० हून अधिक दूषित बोअरवेल्स सील करण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी दररोज ५ लाख लिटर अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी व्हीसीद्वारे घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीला कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. महापालिकेच्या पाण्याचे नमुने शुद्ध आणि पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दूषित पाण्यामुळे आजार उद्भवत असल्याने जिल्हा प्रशासनाला बोअरवेल बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दत्तनगरात सुमारे ५० हून अधिक बोअरवेल असून भूजल सर्वेक्षण विभागामार्फत त्या सील केल्या जाणार आहेत. निर्माण होणारी पाणीटंचाई भरून काढण्यासाठी टँकरद्वारे अतिरिक्त ५ लाख लिटर पाणीपुरवठा, पाणी साठवणुकीसाठी टाक्या आणि महापालिकेच्या खर्चातून वाढीव आकाराचे नळ कनेक्शन दिले जाणार आहे. तसेच आरोग्य शिबिर आणि जनप्रबोधन केले जाणार आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्यात आली असून आता सकाळऐवजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पाणी दिले जाणार आहे.
---
त्वचारोगाचा संशयित ‘क्लस्टर’
अंबड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात त्वचारोगाच्या तक्रारी वाढल्याने आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. अंबड एमआयडीसी परिसरातील दत्तनगर भागात हा संशयित क्लस्टर आढळला आहे. महासभेत हा विषय उपस्थित झाल्यानंतर आयुक्त मनिषा खत्री यांनी वैद्यकीय विभागाला तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार दत्तमंदिर चौक, तुळजाभवानी मंदिर परिसर, कारगिल चौक आणि दत्तनगर या भागात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. वैद्यकीय पथकाने आतापर्यंत २४८ नागरिकांची तपासणी केली असून त्यापैकी १०९ जणांमध्ये त्वचारोगाची सारखीच लक्षणे आढळून आली आहेत. प्रभावित भागात संशयित रुग्णांची यादी तयार करणे आणि घरोघरी सक्रिय सर्वेक्षण सुरू आहे.
---चौकट
बोअरवेलचे पाणी टाळण्याचे आवाहन
प्राथमिक चौकशीत अनेक नागरिक घरगुती वापरासाठी बोअरवेलचे पाणी वापरत असल्याचे समोर आले आहे. या पाण्याचा रंग पिवळसर आणि हिरवट असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे दूषित पाण्यामुळे त्वचारोग पसरल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. महापालिकेने बोअरवेलच्या पाण्याचे नमुने जिवाणू आणि रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल येईपर्यंत नागरिकांनी आंघोळ आणि इतर संपर्कासाठी बोअरवेलचे पाणी टाळून सुरक्षित पर्यायी पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
--चौकट
‘वैद्यकीय सेवा उपलब्ध करा’
बाधित नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतानाच संबंधित भागात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशा सूचना अपर तहसीलदार अमोल निकम यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा व वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. दत्तनगर भागातील दूषित पाण्याच्या प्रश्नावर अपर तहसीलदार निकम यांनी या भागात पाहणी केली. पाहणीत संभाव्य रासायनिक प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागाने १३२ रुग्णांची तपासणी केली असून, त्वचारोगतज्ज्ञांमार्फत आणखी २३ रुग्णांची विशेष तपासणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, सुरक्षित पाणीपुरवठा आणि बाधित नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याच्या सूचना निकम यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा व वैद्यकीय अधिकारी यांना पाठवलेल्या चौकशी अहवालात केल्या आहेत.