फोटो : 31835
नाशिक : जिल्हा परिषदेत महिल व बालविकास विभागातर्फे आयोजित पाककृती स्पर्धेत पदार्थांची चव घेताना सीईओ ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे.
निफाड-२ प्रकल्पाची पाककृती स्पर्धेत बाजी
मालेगाव द्वितीय, रावळगाव तृतीय; पोषणयुक्त आहाराचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.९ : जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेत निफाड-२ (मनमाड) प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. मालेगाव (ग्रामीण) प्रकल्पाने द्वितीय, तर रावळगाव (मालेगाव) प्रकल्पाने तृतीय क्रमांक मिळविला. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
पोषण महा २०२६ अंतर्गत शुक्रवारी (ता. ९) जिल्हा परिषदेत ही स्पर्धा झाली. गर्भवती व स्तनदा मातांचा आहार, सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे पोषण आणि कुपोषण प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे हा स्पर्धेचा उद्देश होता. पोषणयुक्त व संतुलित आहारातून सुदृढ बालक घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
जिल्ह्यातील २६ बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये प्राथमिक स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ पोषण आहार तज्ज्ञ रंजीता राजा, बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल काळे आणि पोषण पुनर्वसन केंद्रातील ज्योती गरड यांनी परीक्षण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्यासह वित्त व लेखा अधिकारी मारुती मुळे, पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ आणि सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे यांनी स्टॉल्सची पाहणी केली.
उत्तेजनार्थ पारितोषिके
सुरगाणा, दिंडोरी आणि हरसूल येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.