३६-२
क्रेनवरील जिंग कोसळून
दोन मजुरांचा जागीच मृत्यू
वाडिवऱ्हेतील फॅब कंपनीतील घटना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३ : वाडिवर्हे (ता. इगतपुरी) येथील फॅब इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीत क्रेन चालवताना झालेल्या गंभीर दुर्घटनेत तीन टन वजनी लोखंडी जिंग अंगावर पडून दोन कामगार जागीच ठार झाले. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात कंत्राट सुपरवायझर आणि क्रेन ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फॅब कंपनीचे व्यवस्थापक निखिल जयंत धुमाळ (४०, रा. अशोकामार्ग, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, २९ ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास कंत्राटदाराचे मजूर जिगिंग विभागात काम करत असताना, कंत्राटदार शिफ्ट इनचार्ज हिमांशूकुमार चौबे याने क्रेन ऑपरेटर संजित चिरंजीव चौधरी यास क्रेन चालवण्यास सांगितले. ऑपरेटर संजीत चौधरी याने क्रेनने उचललेले ३ ते ४ टनांचे लोखंडी अँगलचे बंडल स्टेशन ०३ वरील सुमारे ३ हजार किलो वजनाच्या लोखंडी जिंगला जोरदार धडकले. त्यामुळे स्टँडवर ठेवलेली जिंग खाली कोसळली आणि तिच्याखाली काम करणारे मजूर दीपचंद नंदू बैगा (२८, रा. फॅब कंपनी लेबर कॉलनी, वाडिवऱ्हे), अमरसिंग रतनसिंग ( २७, रा. बिलासपूर, उमरिया, मध्य प्रदेश, सध्या रा. वाडिवऱ्हे) हे दोघे दबले जाऊन जागीच ठार झाले. कंत्राट सुपरवायझर हिमांशू कुमार चौबे, क्रेन ऑपरेटर संजीत चिरंजीव चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक रामनाथ हिरामण दिवे तपास करीत आहेत.
-------------