जिल्ह्यात ८४ टक्के पीक पंचनामे पूर्ण
१,१३२ गावांतील काम पूर्ण; तीन तालुक्यांत शंभर टक्के पंचनामे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पीक पंचनाम्यांची ८४.५४ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. शुक्रवारपर्यंत (ता. ८) एकूण १ हजार ३३९ गावांपैकी १ हजार १३२ गावांतील २ लाख ५ हजार ५४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नांदगाव, इगतपुरी आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील सर्व गावांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त भागांसाठी सरकारने १२ उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत. त्यानुसार पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यांना गती देण्यात आली आहे.
पूर्ण झालेल्या पंचनाम्यांमध्ये २ लाख ५३ हजार ७०० खातेदारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. उर्वरित गावांतील पंचनामे सुरू असून, त्यातून बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तालुकानिहाय चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुकानिहाय स्थिती
बागलाण तालुक्यात १७२ पैकी १६५, मालेगावमध्ये १५१ पैकी ७५, देवळ्यात ४६ पैकी ३८, कळवणमध्ये १५२ पैकी १२४, सुरगाण्यात १९१ पैकी १८१, पेठमध्ये १४६ पैकी १३२ आणि येवल्यात १२४ पैकी ६० गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नांदगावमधील १००, इगतपुरीतील १२६ आणि सिन्नरमधील १३१ गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
आणखी तीन तालुक्यांत पंचनामे
राज्य सरकारने १८ तालुक्यांतील २० टक्के क्षेत्राचे पीक पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, निफाड आणि चांदवड या तालुक्यांचा समावेश आहे. या तीन तालुक्यांत लवकरच पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.