सारूळच्या सहा क्रशरचालकांना नोटीसा
नाशिक तहसीलदारांकडे सोमवारी सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : सारळ व परिसरातील सहा क्रशरचालकांना बुधवारी (ता.७) नाशिक तहसीलदारांनी नोटीस बजावल्या आहेत. यासंदर्भात सोमवारी (ता.१२) दुपारी तीन वाजता सुनावणी पार पडणार असून त्यावेळी सदर नोटिसधारकांना त्यांचे लेखी म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.
महसूल प्रशासनाने सारूळ व राजूरबहुला परिसरातील स्टोन क्रशरचालकांविरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत सुमारे ४९ क्रशर सील करण्यात आले. तसेच परिसरातील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला. सहा क्रशर चालकांनी या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणी वेळी संबंधित क्रशरधारकांना कारवाईपूर्वी नोटीस देत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नसल्याचे सांगत न्यायालयाने २६ जून २०२६ रोजी तहसीलदारांनी दिलेला आदेश रद्द केला. तसेच न्यायालयाने प्रकरण तहसीलदारांकडे परत पाठविले.
उच्च न्यायालयाने सदर प्रकरणात संबंधितांना नोटीस बजावत म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असे आदेश महसूल प्रशासनाला दिले. त्यानुसार तहसीलदार पंकज पवार यांनी बुधवारी (ता.७) सहाही याचिकाकर्ते क्रशर चालकांना सुनावणीसंदर्भात नोटीस बजावली. या नोटिसीच्या आधारावर सोमवारी (ता.१२) दुपारी सुनावणी पार पडणार आहे. यावेळी क्रशरचालक काय बाजू मांडतात, तसेच प्रशासन संबंधित क्रशरला परवानगी देणार का? हे सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.