फोटो : H31367
नाशिक : घनसावंगी (जि. जालना) येथील खून प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित. समवेत शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक.
खून प्रकरणातील दोघांना बेड्या
जालना पोलिसांच्या स्वाधीन; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : घनसावंगी (जि. जालना) येथील भरदिवसा घडलेल्या खून प्रकरणातील दोघा संशयितांना नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांना पुढील तपास कामासाठी जालना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नीलेश राजेंद्र धनगर (२५, रा. म्हसरूळ, दिंडोरी रोड), दर्शन अशोक पाटील (२४, रा. देवकृपा सोसायटी, सौभाग्यनगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, घनसावंगीत गेल्या ३० सप्टेंबरला अज्ञात चौघांनी धारदार कोयत्याने वार करून एकाचा खून केला होता. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात खूनाचा दाखल आहे. याच गुन्ह्यातील संशयित हे नाशिकचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथक संशयितांचा शोध घेत होते. दरम्यान, शनिवारी (ता. ३) हवालदार प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे यांना दोन संशयित द्वारका परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने द्वारका सर्कल ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. या दरम्यान संशयितरीत्या येणाऱ्या दोघांना सापळा रचून जागीच ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, रमीज शेख, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, अंमलदार मुक्तार शेख, अमोल कोष्टी व अनुजा येलवे यांच्या पथकाने कामगिरी बजावली.