
नाशिक : नाशिक शहराला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्र्वर, साडेतील शक्तीपीठांपैकी एक वणीची सप्तशृंगी माता, वनवास काळातील श्रीरामाचे वास्तव्य यामुळे शहरात वर्षभर धार्मिक पर्यटनासाठी भाविकांचा राबता असतो. सायंकाळची गोदाआरती, हरिहर भेट, रामनवमीला निघणारा रामाचा रथ, धुलिवंदनाला वीरांची मिरवणूक, रंगपंचमीची रहाड परंपरा, ठिकठिकाणी होणारा यात्रोत्सव यामुळे वर्षभर शहरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. त्याचबरोबर बंगाली, गुजराथी, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन असे सर्वधर्मीयांचे सण शहरात जल्लोषात साजरे करण्यात आले.