नाशिक शहराला स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
कुंभमेळ्यापूर्वी सुरक्षेला बळ; राज्यातील दहा महानगरपालिकांसाठी शासनाची अधिसूचना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धर्तीवर राज्यातील दहा मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वतंत्र शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक महानगरपालिकेचाही समावेश असून, प्राधिकरण कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद-सिंगल यांनी यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना पाठविले आहे. सुधारित आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्यातील अ, ब आणि क वर्गातील दहा मोठ्या महानगरपालिकांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केली आहे. शहरांच्या नागरी क्षेत्रातील आपत्तीपूर्व तयारी, क्षमताबांधणी आणि आपत्ती सौम्यीकरणाचे नियोजन अधिक प्रभावी करण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर राहणार आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण
नाशिक शहराला दरवर्षी गोदावरी नदीच्या पुराचा धोका, अतिवृष्टी, वादळी वारे, आगीच्या घटना, इमारत दुर्घटना आणि रस्ते अपघात अशा विविध आपत्तींचा सामना करावा लागतो. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाची सक्षम यंत्रणा उभारणे अत्यावश्यक ठरणार आहे. गर्दीचे नियोजन, चेंगराचेंगरीची संभाव्य परिस्थिती, आग, पूर तसेच वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
महापालिकेच्या विभागांत समन्वय वाढणार
आतापर्यंत शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी प्रामुख्याने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे होती. मात्र, स्वतंत्र शहरी प्राधिकरणामुळे महापालिका स्तरावरच निर्णयप्रक्रिया आणि प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. अग्निशमन, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक अशा महापालिकेच्या विविध विभागांमध्ये थेट समन्वय साधता येणार आहे. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करणे शक्य होईल.
प्राधिकरणाच्या रचनेचा प्रस्ताव तयार करावा लागणार
शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेला या प्राधिकरणाची रचना, पदाधिकारी, स्वतंत्र कार्यालय, कर्मचारीवर्ग, निधी आणि कार्यपद्धती यासंदर्भातील प्रशासकीय प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. आयुक्त स्तरावरून आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरण औपचारिकपणे कार्यान्वित होईल. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, शहरातील आपत्ती व्यवस्थापनाला स्वतंत्र प्रशासकीय बळ मिळण्यासोबतच नाशिककर आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभी राहण्याची अपेक्षा आहे.