Latest Marathi News | स्थलांतरानंतरही ‘अडचणीचे’ शुक्लकाष्ठ कायम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Bank new building near Kanda Batata Bhavan

Nashik News : स्थलांतरानंतरही ‘अडचणीचे’ शुक्लकाष्ठ कायम!

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या आर्थिक डबघाईला द्वारकेवरील कब्रस्थानाची जागाच कारणीभूत असल्याचा जावईशोध लावत २०१८ मध्ये तत्कालीन संचालक मंडळासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बॅंकेचे मुख्यालय पुन्हा जुन्या, सीबीएसजवळील जुन्या इमारतीत स्थलांतरित झाले. स्थलांतरित होऊन चार वर्ष उलटूनही जिल्हा बॅंकेपुढील अडचणी कमी झालेल्या नाहीत.

कोट्यवधींची वसुली होत नसल्याने बॅंक आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे स्थलातंरित होऊन नेमके काय साध्य केले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Nashik District Bank is under economic loss Nashik news)

हेही वाचा: Nashik News : शहरात 2 महिलांच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा बँक कधी नव्हे इतक्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. बँकेला सतत होणारा तोटा, बरखास्तीची कारवाई, संचालकांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, तिजोऱ्या लुटण्याचे प्रमाण यामुळे २०१८ मध्ये सगळेच चिंताक्रांत होते. त्यावेळी या आर्थिक अरिष्टाचा संदर्भ थेट अंधश्रद्धेशी जोडण्यात आला.

जिल्हा बँकेचे मुख्यालय पूर्वी सीबीएसजवळील जुन्या इमारतीत होते. २००७ मध्ये या इमारतीतून जिल्हा बँकेचे मुख्यालय हे द्वारका भागातील नव्याने पाच कोटी खर्चून बांधलेल्या इमारतीत करण्यात आले होते.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : चमकोगिरी करणाऱ्यांना ‘गुंडा स्कॉड’ चा दणका

तत्कालिन अध्यक्ष माणिकराव कोकाटेंच्या कार्यकाळात ही इमारत उभारण्यात आली होती. गाजावाजा करून त्याचे स्थलांतरही करण्यात आले. परंतु, हे स्थलांतर झाल्यापासून बँकेला अवकळा आल्याचा समज वाढीस लावला गेला. द्वारकेवरील नव्या इमारतीची जागा कब्रस्थानच्या मालकीची होती. या ठिकाणी दफनविधी होत असत, असे सांगितले जात होते. परंतु, बँकेने २००२ मध्ये ही जागा एका ट्रस्ट्रकडून जप्त केली होती.

त्यामुळे ही जागा शापित असल्याचे सांगत तिला भुताटकीने पछाडलेले असल्याचा समज येथे कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा झाला असल्याचे सांगत, नव्या इमारतीतील स्थलांतरानंतरच बँक आर्थिक डबघाईस आल्याची ओरड त्यावेळी करण्यात आली. त्यानंतर, तत्कालीन संचालक मंडळाने बॅंकेचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.

एकाच वेळेस स्थलांतर केल्यास गाजावाजा होईल म्हणून टप्प्याटप्प्याने स्थलांतर मे २०१८ मध्ये झाले. मात्र, बॅंकेचे स्थलांतर होऊनही बॅंकेसमोरील अ़डचणींचा डोंगर जैसे थे आहे. याउलट, या जागेत स्थलांतर झाल्यानंतर संचालक मंडळ बरखास्तीची कार्यवाही होऊन संचालक मंडळाला घरी जावे लागले. कलम 88 अतंर्गत कारवाई होऊन आजी-माजी संचालक, कर्मचा-यांकडून वसुली काढण्यात आली.

हेही वाचा: Nashik News : जगताप आत्महत्त्याप्रकरणातील मणियारला अटक

स्थलांतरीत झाल्यापासून बॅकेवर प्रशासकाची नेमणूक झालेली आहे. सद्यस्थितीत बॅंकेला थकबाकी वसुलीस मोठया राजकीय अडचणी येत आहे. आजमितीस बॅंकेची २१४१ कोटींची थकबाकी असून एनपीए थेट ६०.१३ टक्यांवर पोहचला आहे. प्रशासकांकडून बॅंकेचा आर्थिक गाडा रूळावर आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, अडचणी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे बॅंकेने स्थलांतरीत नेमके काय साध्य केले अशी चर्चा आहे.

पाच कोटींची इमारत धूळखात

सीबीएसवरील जुन्या बँकेची जागा अपुरी पडत असल्याचे सांगत, २००३-०४ मध्ये तत्कालिन संचालक मंडळाने द्वारकेवरील जागेत नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाचे तब्बल पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. २००७ मध्ये या जागेचे शुद्धिकरण होऊन या ठिकाणी बँकेचे स्थलांतरही करण्यात आले होते. मात्र, आता बॅंक पुन्हा जुन्या इमारतीत गेल्याने पाच कोटींची ही इमारत धूळखात पडली आहे. येथे, बॅंक शाखा व लॉकर्स वगळता कोणतेही कामकाज नसून, इमारतीतील इतर विभाग कुलूप बंद आहे. याउलट येथील लाईट बील, सुरक्षाचा खर्च बॅंकेला सोसावा लागत आहे. इमारत पडून असल्याने बॅंकेच्या खर्चात वाढत आहे.

हेही वाचा: Nashik News : रेणुकादेवी सूतगिरणीची मालमत्ता विक्रीला; जिल्हा बॅंकेचा दणका