जिल्हा परिषदेतून...
एकजुटतेतून समृद्धी; नाशिक राज्यात अव्वल
एकजुटीच्या बळावर मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात नाशिकने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद गटापाठोपाठ पंचायत समिती व ग्रामपंचायत गटातही मोहोर उमटवीत नाशिकने राज्यभर कीर्ती पसरविली. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची सक्षम भूमिका आणि त्यास मिळालेली सकारात्मक साथ यामुळेच हे शक्य झाले.
- किरण कवडे
गावपातळीवरील भाऊबंदकीच्या राजकारणाचा परिणाम थेट गावच्या विकासावर होतो. पण गाव एकसंध राहिले तर निश्चितपणे विकास होतो, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. पण त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अभियानाची सुरुवात १७ सप्टेंबर २०२५ पासून झाली. प्रथमतः ३१ डिसेंबरपर्यंत मूल्यांकनाचा कालावधी होता. पण त्याला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली. या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास २७६ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवला. अर्थात, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सर्वच ग्रामपंचायतींना यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मूल्यांकनासाठी शासनाने आठ निकष ठरवून दिले. त्यानुसार गुणांचे विभाजन करून ग्रामपंचायतींना पुरावे सादर करण्यास सांगितले. सुशासनयुक्त पंचायतीला १६ गुण, सक्षम पंचायत १० गुण, जलसमृध्द, स्वच्छ व हरित गावाला १९, मनरेगा व इतर योजनांसाठी सहा गुण ठेवण्यात आले. केवळ शासकीय पातळीवरील उपाययोजना होणे अपेक्षित नाही तर लोकांचा सहभाग व नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले.
संस्था सक्षमीकरणास १६ गुण, उपजीविका विकासाला सर्वाधिक २३ गुण, लोकसहभाग व नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रत्येकी ५ गुण देत मुख्य घटकांचे विभाजन केले. नाशिक जिल्हा परिषदेने प्रत्येक ग्रामपंचायतीला या घटकांवर लक्ष देण्याचे निर्देश देत त्यांच्याकडून काटेकोरपणे काम करून घेण्यात ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी परिश्रम घेतले. तर गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत या अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले. प्रत्येक टप्प्यावर आपण सरस कसे ठरु शकतो, याचा सुक्ष्म अभ्यास करत त्यानुसार ऑनलाइन अर्ज सादर केले. सोबत जिओ टॅगिंग असलेले फोटो जोडणे, पूर्वीची परिस्थिती व सद्यःस्थिती यातील भेद दाखविणारे पुरावे, गावच्या विकासात लोकांचा सहभाग, पाणंद रस्ते, पाणी व स्वच्छतेत गावाने घेतलेला सहभाग या सर्व पातळ्यांवर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे मूल्यांकन केले.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची तपासल्यानंतर पुरस्कार वितरणाचा मुख्य सोहळा नाशिकमध्ये घेण्याचे निश्चित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत ११ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. पाच कोटींचे बक्षिस आपल्या जिल्ह्याला मिळाले. पुरस्काराच्या रकमेपेक्षा झालेला सन्मान हा सर्वांची मान अभिमानाने उंचविणारा ठरला. जिल्हा परिषदेपाठोपाठ नाशिक पंचायत समितीने या गटात राज्यात पहिला क्रमांक मिळवत आनंद द्विगुणित केला. त्यांना दोन कोटींचे बक्षिस मिळाले. तर ग्रामपंचायत गटातही बागलाण तालुक्यातील ‘लाडुची’ ग्रामपंचायतीने आनंद शिखरावर पोहोचवला. प्रत्येक गटात नाशिकची कामगिरी सरस ठरली. याचे मुख्य रहस्य म्हणजे ग्रामपंचायतीने ऑनलाइन सादर केलेले अर्ज आणि पुराव्यांची दिलेली जोड यामागे आहे. तसेच ग्रामसेवक, लोकसहभाग, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत ‘रंग लाई’. जिल्ह्यातील २७५ ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांचे अनुभव ऐकून घेत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्यांना अधिक उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. समृध्द पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याला नवीन ओळख आणि नवा स्वाभिमान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला गौरव जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरेल. त्यापेक्षा अभियानाच्या पुढील टप्प्यावर अधिकाधिक काम करण्याची ऊर्जा देईल. यातूनच ग्राम समृद्धीचा मार्ग प्रशस्त होत जाईल.