Nashik | विभागात पाचशेहून अधिक जातीवाचक वस्त्यांची नावे बदलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Game
नाशिक विभागात पाचशेहून अधिक जातीवाचक वस्त्यांची नावे बदलली

नाशिक विभागात पाचशेहून अधिक जातीवाचक वस्त्यांची नावे बदलली

नाशिक - राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे सामाजिक बदलांची सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागात तत्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून, पाचशेहून अधिक जातीवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून, समाजकल्याण विभागाचे काम समाधानकारक असल्याची माहिती विभागीय आयुक्त्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.

गुरुवारी (ता. १८) विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय दक्षता व नियंत्रण, महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या समितीची बैठक व तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ व इतर अनुषंगिक विषयांचा दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. त्या वेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. दूरदृश्‍यप्रणालीद्वारे नाशिक येथून जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगर येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, धुळे येथून जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नंदुरबार येथून जिल्हाधिकारी महेश पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

हेही वाचा: तरुण शेतकऱ्याने पिकवला माळमाथ्याच्या मातीत द्राक्षाचा गोडवा

समाजकल्याण विभागाचा पुढाकार

गमे म्हणाले, ‘‘राज्यातील, विभागातील, जिल्ह्यातील तसे ग्रामपंचायत, गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक गावांची नावे, वस्त्यांची, रस्त्यांची नावे जातिवाचक असल्याची बाब समोर आल्याने राज्यातील सामाजिक सलोखा व सुधारणा निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ही जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबत समाजकल्याण विभागाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने विविध समित्या स्थानिकस्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत.’’

बदललेल्या नावाची स्थिती :

जिल्हानिहाय बदललेली नावे संख्या :

नाशिक शहरी क्षेत्र १९

नाशिक ग्रामीण ३२४

धुळे ११

नंदुरबार ७५

जळगाव २८

अहमदनगर ६८

loading image
go to top