पान दोन
-------------
13010
नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देताना विष्णुपंत म्हैसधुणे ,बाळासाहेब मस्के, साहेबराव पेखळे आदी.
नाशिक तालुका दुष्काळी जाहीर करावा
राष्ट्रवादीतर्फे पालकमंत्र्यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता. २९ : नाशिक तालुक्यात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता तालुका तातडीने दुष्काळी म्हणून जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून सवलती व मदत द्यावी, अशी मागणी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसने केली. जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना याबाबत निवेदन दिले. तालुक्यात पावसाने सलग ३८ दिवसांपासून खंड दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी पश्चिम पट्ट्यातील भातशेती, भुईमूग, टोमॅटो, तसेच पूर्व व दक्षिण पट्ट्यातील सोयाबीन, भुईमूग आणि इतर खरीप पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. विहिरी आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांच्या काढणीची वेळ आली असून, त्याच काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळण्यापूर्वी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नाशिक तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मस्के, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, साहेबराव पेखळे ,विलास कांडेकर, रमेश कहांडळ, अंकुश भोर, दर्शन मस्के उपस्थित होते.