चित्र दुष्काळाचे/नाशिक
-------------------
फोटो : NSK26H33823
महिरावणी : शिवारात कमी पावसात वाळलेले सोयाबीन.
पिकांचे नुकसान, वाढता खर्च; शेतकऱ्यांना दिलासा हवा
-------------------------------------------
सिंचनाचा वाढलेला खर्च, संभाव्य चारा-पाणीटंचाईचा विचार होण्याची अपेक्षा
किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२८ : धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असतानाही पावसाच्या खंडामुळे नाशिक तालुक्यातील शेती संकटात सापडली आहे. भात, सोयाबीन, मका आणि भाजीपाला पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, द्राक्षबागा जगविण्याचे आव्हानही शेतकऱ्यांसमोर आहे. सिंचनाचा वाढलेला खर्च, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेता, केवळ पाऊस व धरणांतील साठ्याच्या निकषांवर दुष्काळाचे मूल्यांकन न करता नाशिकचा दुष्काळी तालुक्यांत समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
शहराला भाजीपाला, फुलांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक तालुक्यात द्राक्ष बागांसह खरीप व रब्बीतील प्रमुख पिके घेतली जातात. यात मका, सोयाबिन, उसाचा समावेश होतो. नाशिक शहराच्या चौफेर या तालुक्याचा विस्तार असल्यामुळे शहरातील बाजारपेठेत तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी नियमितपणे येतो. त्यामुळे क्षेत्र कमी असले तरी शेतकरी भाजीपाल्यासह नगदी पिके घेऊन आपला उदरनिर्वाह चालवितात. चालू वर्षी दुष्काळाच्या झळा त्यांनाही बसल्या आहेत. टोमॅटो, वांगी, पालेभाज्या यांच्या किमतीत कमालीची घट झाल्याने त्यांना तोटा सहन करावा लागतो. तर दुसरीकडे पाण्याअभावी पिकांना थेट सिंचन व्यवस्थेद्वारे पाणी द्यावे लागत आहे. वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावते. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारे धरणे तुडुंब भरलेली असल्यामुळे दुष्काळाच्या निकषांमधे हा तालुका बसू शकलेला नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी शासनावर नाराज आहेत. त्यांनी आमदार सरोज अहिरे यांच्या मार्फत शासनाकडे आपली कैफियत मांडली आहे. अद्याप त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नसल्यामुळे नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीतील ५ हजारांच्या मदतीपासून वंचित रहावे लागेल.
टंचाईच्या उपाय योजनांमध्ये समावेश नाही
टंचाईच्या नावाखाली होणाऱ्या उपाययोजनांमध्ये नाशिक तालुक्याचा समावेश होत नाही. परिणामी, या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, चारा छावणी यांसारख्या उपाय योजनाचा लाभ मिळणार नाही. गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना चारा टंचाई भासू शकते. याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
कोट...
दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिकचा समावेश व्हायला हवा. येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला व फळबागांना नियमितपणे पाणी लागते. दुष्काळामुळे शेतीचा खर्च वाढला असून त्यांना जास्त मदत मिळाली पाहिजे.
- तानाजी महाले, शेतकरी (फोटो - NSK26H33826)
कोट...
यंदा दिवाळीपूर्वीच दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत पावसाळा सुरु होता. अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी नुकसान झाले. यंदा पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना सरकारने मदत केली पाहिजे.
- लीना कासार, शेतकरी, शेवगेदारणा (फोटो - NSK26H33825)
इन्फो...
धरणसाठा (टक्क्यांमध्ये)
गंगापूर -९२.७५
काश्यपी-९९.०८
गौतमी गोदावरी-९९.३६
आळंदी-९४.४९
इन्फो...
तालुक्यातील पशुधन
गायवर्ग- ४०९३७
म्हैसवर्ग- ३२८३१
मेंढ्या- १७५३
शेळ्या- २०८५३
एकूण - ९६३७४
…
या आहेत नाशिककरांच्या प्रमुख अपेक्षा
- दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिकचा समावेश व्हायला हवा.
- भात, सोयाबिन, मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव मदत मिळाली पाहिजे.
- पावसाअभावी सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी जास्त खर्च येतो. याचा विचार करून शासनाने दुष्काळी तालुक्यांमधील शेतकऱ्यांप्रमाणे भरपाई द्यावी.
- तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारी धरणे तुडुंब भरलेली दिसत असली तरी शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींमध्ये पुरेसा साठा राहिलेला नाही.
- उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शासन किंवा प्रशासनाकडून मदत मिळणार नाही. गुरांची संख्याही जास्त असल्यामुळे त्यांना चारा मिळाला पाहिजे.
- पावसाचे प्रमाण किंवा धरणांमधील साठ्याच्या आधारे दुष्काळाच्या निकषांमध्ये नाशिक तालुका बसत नसला तरी पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे.
- सोयाबिन, मका, भाताचे सरासरी उत्पन्न घटल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. भाजीपाल्याचेही नुकसान झाले असून उन्हाळ्यात द्राक्ष बागा कशा टिकवायच्या असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
- शासनाने या सर्व घटकांचा गांभीर्याने विचार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी.