नाशिकमध्ये ई-पासपोर्ट छपाईला वेग
---
ऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण; यंदा दोन कोटी पासपोर्ट छपाईचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. १६ : नाशिकच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात ई-पासपोर्ट छपाईच्या कामाला वेग आला आहे. चालू आर्थिक वर्षातील निर्धारित उद्दिष्टाच्या जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले. ता. ३१ मार्च २०२७ पर्यंत एक कोटी ८० लाख ई-पासपोर्ट छापण्याचे उद्दिष्ट असताना आर्थिक वर्ष संपण्यास चार महिने शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच सुमारे २० लाख अधिक पासपोर्ट छापण्याचे नियोजन आहे. यंदा एकूण दोन कोटी पासपोर्ट छापले जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
नाशिक रोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात सुमारे एक हजार ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे पासपोर्ट उत्पादनात सातत्याने वाढ होते. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांचे समर्पण यामुळे निर्धारित वेळेच्या आधीच उद्दिष्टातील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामगिरीबद्दल जुंद्रे यांनी समाधान व्यक्त केले.
नाशिक रोड देशातील प्रमुख केंद्र
देशातील पासपोर्ट छपाईचे प्रमुख केंद्र म्हणून नाशिक रोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयाची ओळख आहे. येथे १ एप्रिल २०२४ पासून ई-पासपोर्ट छपाई सुरू झाली. संशोधन आणि विकासाच्या तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पासपोर्ट तयार केले जात आहेत. मागील आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२६ पर्यंत एक कोटी २२ लाख ई-पासपोर्ट छापण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. त्यापूर्वी २०२५ मध्ये एक कोटी ५७ लाख पासपोर्ट छापण्याचे उद्दिष्टही कामगारांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले होते.
यंदा उत्पादनाचे उद्दिष्ट वाढवून एक कोटी ८० लाख करण्यात आले आहे. आतापर्यंत त्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित चार महिन्यांत उत्पादनाचा वेग आणखी वाढविण्याची तयारी आहे.
१४१ हून अधिक देशांत ई-पासपोर्ट
सुरक्षेच्या दृष्टीने जगभरात ई-पासपोर्टचा वापर वाढत आहे. फ्रान्स, जपान, कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह १४१ हून अधिक देशांनी ही व्यवस्था स्वीकारली. इलेक्ट्रॉनिक चिपवर आधारित ई-पासपोर्टमध्ये नागरिकांची वैयक्तिक आणि जैवमितीय माहिती सुरक्षित ठेवली जाते. त्यामुळे बनावट पासपोर्टचा वापर रोखण्यास मदत होते.
भारतातही ई-पासपोर्ट वितरणाचा विस्तार होत असून, भुवनेश्वर, नागपूर, जम्मू, गोवा, शिमला, रायपूर, अमृतसर, चेन्नई, जयपूर, हैदराबाद आणि सोलापूरसह विविध शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
शिक्षण, पर्यटनामुळे मागणीत वाढ
परदेशात उच्चशिक्षण, वैद्यकीय उपचार, पर्यटन तसेच व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पासपोर्टची मागणीही वाढली. नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन भारत प्रतिभूती मुद्रणालयात उत्पादन वाढविण्यावर भर दिला जातो.
ई-पासपोर्टमधील इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये नाव, जन्मतारीख, पासपोर्ट क्रमांक, चेहऱ्याची ओळख आणि बोटांचे ठसे यांसारखी माहिती सुरक्षितपणे साठवली जाते. यामुळे पासपोर्ट व्यवस्था अधिक आधुनिक आणि सुरक्षित होत आहे.
पासपोर्टचे शुल्क
छत्तीस पानांच्या दहा वर्षे वैधता असलेल्या सामान्य पासपोर्टसाठी दोन हजार ५०० रुपये, तर तत्काळ पासपोर्टसाठी पाच हजार रुपये शुल्क आहे. साठ पानांच्या पासपोर्टसाठी अनुक्रमे तीन हजार ५०० आणि सहा हजार रुपये शुल्क आकारले जाते. अल्पवयीन तसेच हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टच्या जागी नवीन पासपोर्ट काढण्यासाठी स्वतंत्र शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
कोट
निर्धारित उद्दिष्टापैकी जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले. यंदा एक कोटी ८० लाखांच्या उद्दिष्टाऐवजी सुमारे दोन कोटी पासपोर्ट छापले जाण्याचा अंदाज आहे. कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सुधारित कार्यपद्धतीमुळे हे शक्य झाले. पासपोर्ट उत्पादनामुळे देशाची गरज भागविण्याबरोबरच सरकारी महसुलातही महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.
- ज्ञानेश्वर जुंद्रे, कामगार नेते, मजदूर संघ