NSK26H33606
नाशिक : मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उदघाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. संदीप गुळवे आदी. (छायाचित्र ः केशव मते)
----------
मविप्र वसतिगृह ठरेल ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी घरकुल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ः केबीटी अभियांत्रिकीच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ः मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातून, खेड्यापाड्यातून आणि छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्यांवरून उच्च शिक्षण घेत अभियंता होण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन विद्यार्थी नाशिकला येतात. मविप्र वसतिगृहात शांत व पोषक वातावरण मिळणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे हक्काचे घरकुल ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.२६) व्यक्त केला.
--------------
‘मविप्र’च्या गंगापूर रस्त्यावरील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसमध्ये उभारलेल्या कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृह इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे होते. पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांच्यासह संचालक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की शंभर वर्षाहून अधिक काळापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या थंडगार सावलीत आज लाखो विद्यार्थी शिकत असून, हे मोठे यश आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था योगदान देत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. हेलिक्राफ्टर झेपावण्यासाठी वेळेचे बंधन असल्याने लवकर रजा घेत असल्याचे सांगत, पुढील कार्यक्रमात पूर्णवेळ हजेरी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकास कामांना गती मिळत आहे. या विकास प्रक्रियेत शैक्षणिक संस्थांचे योगदानही महत्त्वाचे आहे. तरुणांना दर्जेदार शिक्षण देणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणे हे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
ॲड.ठाकरे म्हणाले, की वसतिगृहाच्या तेरा मजली इमारतीत १४३ खोल्या आहेत. सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था उपलब्ध होईल. प्रत्येक खोलीत स्वतंत्र शौचालय व स्नानगृह, वसतिगृहात सीसीटीव्ही, लिफ्ट, भोजन व्यवस्था, लॉन्ड्री, जिमखाना, शुद्ध पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध आहेत. मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी आभार मानले. प्रा. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
--