चालकाकडून पैसे लांबवून बनावट नोटांचे पार्सल
भागीदारीचे आमिष; संशयित अटकेत, साथीदाराचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : व्यापारात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील चालकाला नाशिकला बोलावून घेत त्याच्याकडील एक लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आली. त्याबदल्यात तीन लाख रुपये असल्याचे सांगत बनावट नोटांचे पार्सल देऊन फसवणूक केल्याचा प्रकार दिंडोरी रोड परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वैभव यशवंत कडरे (वय २४, रा. मेहरधाम, पेठ रोड) याला अटक केली आहे.
याप्रकरणी आरिफ अब्दुल रहीम शेख (वय २३, रा. कफ परेड, कुलाबा, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी शेख यांना ‘आमच्यासोबत व्यवसाय करायचा आहे का?’ असे सांगून नाशिकला बोलावून घेतले.
शुक्रवारी (ता. २) सकाळी साडेसातच्या सुमारास दिंडोरी रोडवरील गजपंथ, यमाहा शोरूमजवळ शेख यांची संशयितांशी भेट झाली. त्या वेळी संशयितांनी त्यांच्याकडून एक लाख रुपये घेत खाकी रंगाच्या चिकटपट्टीने पॅक केलेले पार्सल दिले. या पार्सलमध्ये तीन लाख रुपये असल्याचे सांगून दोघे दुचाकीवरून फरारी झाले.
संशय आल्याने शेख यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यात बनावट नोटा आढळल्या. त्यांनी तत्काळ म्हसरूळ पोलिसांत तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पेठ रोड परिसरातून कडरे याला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून, पुढील तपास अंमलदार सतीश वसावे करीत आहेत.