नाशिकमध्ये स्फोटाचा बनावट व्हिडिओ व्हायरल
तरुणाला अटक; इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे खळबळ; सायबर पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१४ : नाशिकमध्ये दोन ठिकाणी स्फोट झाल्याचा बनावट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी दिनेशकुमार गिरीधारी रजक (वय २३, मूळ रा. झारखंड) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान ‘उज्जैन गँगस्टर महाकाल’ या इन्स्टाग्राम खात्यावर नाशिकमध्ये दोन ठिकाणी स्फोट झाल्याचा मॉर्फ केलेला बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. सायबर पोलिसांच्या गस्तीवेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गुन्हा दाखल करून संशयिताचा शोध घेण्यात आला.
मूळचा झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्याचा रहिवासी असलेला रजक रोजंदारीवर काम करतो. तो सध्या कॉलेज रोड परिसरातील डिसूझा कॉलनीत भाड्याने राहतो. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
कोट
सोशल मीडियावर अफवा पसरविणारे मजकूर, व्हिडिओ किंवा छायाचित्रे प्रसारित करू नयेत. आक्षेपार्ह बाबींवर पोलिसांची करडी नजर असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक