जिल्ह्यातील ४,६९१ शेतकरी कर्जमुक्त

जिल्ह्यातील ४,६९१ शेतकरी कर्जमुक्त
Published on: 
जिल्ह्यातील ४,६९१ शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ तिसरी यादी घोषित; आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१३ : राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत तिसरी लाभार्थी यादी मंगळवारी (ता.१३) जाहीर केली. या यादीत नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ६९१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४४ हजार ३८७ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी ३६ हजार १६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २३ हजार ७७१, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ४२ हजार २३५ अशा एकूण ६६ हजार ६ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बँक शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांतील ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांची कर्जखाती शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार पूर्णपणे निरंक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तीन टप्प्यांत लाभार्थी याद्या शासनाने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ३५ हजार ८९० शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी ३३ हजार ३७३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत ३ हजार ८०६ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी २ हजार ७९४ जणांचे प्रमाणीकरण झाले आहे. आता तिसऱ्या यादीत ४ हजार ६९१ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. थकबाकीची खातरजमा करून ई-केवायसी करा शेतकऱ्यांची कर्जथकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ही प्रक्रिया जवळच्या आपले सरकार किंवा ई-सेवा केंद्रात विनामूल्य करता येईल. मयत व वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यपद्धती योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असल्यास किंवा वयोमानामुळे बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचणी येत असल्यास, कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी विशेष मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. कोट पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा. आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार किंवा ई-सेवा केंद्रात जाऊन विनामूल्य ई-केवायसी पूर्ण करावी. - कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com