गवळवाडी पर्यायी मार्गाचा विचार करावा
रिंगरोड बाधितांचे विभागीय आयुक्तांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : प्रस्तावित रिंगरोड अलाईंटमेंन्टची तांत्रिक चौकशी करतानाच गवळवाडीच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे साकडे बाधित शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना घातले. या वेळी डॉ. गेडाम यांनी शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्ग २९ मधील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिकरोड येथे विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. गेडाम यांची भेट घेतली. या वेळी एमएसआयडीसीएलने रिंगरोड प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या अलाइनमेंटबद्दल चर्चा झाली. त्यामध्ये प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी, अनावश्यक वळणे, बाधित घरांचे व बागायती जमिनींचे नुकसान, उपलब्ध शासकीय रस्ते आणि पर्यायी मार्गिकांबाबत उपस्थित शेतकऱ्यांनी माहिती दिली. तसेच रिंगरोडमधील अलाइनमेंटची तांत्रिक चौकशी करत न्याय देण्याची मागणी करण्यात आली. रिंगरोड प्रकल्पात गवळवाडीच्या पर्यायात कमीतकमी नुकसान होणार असल्याची बाबही शेतकऱ्यांनी आयुक्त गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अलाइनमेंटमधील तांत्रिक त्रुटींची चौकशी करून अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. तसेच बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयुक्त गेडाम यांनी दिल्याचा दावा शिष्टमंडळाने केला आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, पंकज खताळे, शिवाजीराव डांगले, भारत पिंगळे, प्रवीण पाटील यांच्यासह बाधित गावांतील प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.