पान-१ साठी
---------------
जिल्ह्यात ६ लाख ४४ हेक्टरवर खरीप करपला
जिल्हा प्रशासनाचा सरकारला अहवाल : शेतकरी मदतीसाठी ६५८ कोटींचा मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२६ : पावसाने दीर्घकालीन ओढ दिल्याने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १३ तालुक्यातील खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील ६ लाख ४४ हजार २८९ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तब्बल ३ हजार ३०६ गावांमधील ६ लाख ८७ हजार ६५ शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ६५८ कोटी ६० लाख ३६ हजारांच्या निधीची मागणी सरकारकडे केली आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, उत्साहात ६ लाख ५१ हजार २८७ हेक्टरवर (१०१.६८ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिके करपली आहे. सरकारने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मदत व पुनर्वसन विभागामार्फत पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांत ''ट्रिगर १'' लागू केली. तसेच दुसऱ्या टप्यात टप्प्यात निफाड, त्र्यंबकेश्वर आणि चांदवड या ३ तालुक्यांत ''ट्रिगर-२'' लागु केले. संबंधित तालुक्यात विविध १२ प्रकारच्या उपाययोजना लागू करताना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हा प्रशासनाने कृषी व संबंधित विभागांच्या मदतीने पंचनाम्यांची कामे पूर्ण केली आहेत. महसूल व कृषी विभागातर्फे सोमवारी (ता.२६) नुकसानीचा अंतिम अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रावरील सर्वाधिक नुकसान झाले असून तब्बल ५ लाख ४३ हजार ५४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. याशिवाय ५४,६८७ हेक्टर बागायत क्षेत्र तर ४६ हजार ५३ हेक्टर बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. शासन स्तरावरून लवकरात लवकर योग्य निर्णय होऊन हक्काची मदत मिळेल, अशी प्रतीक्षा बळीराजा करत आहे.
---
जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान (हेक्टर)
पिकांचा प्रकार...........बाधित क्षेत्र........... बाधित शेतकरी...........अपेक्षित रक्कम (लाखात)
कोरडवाहू...........५४३५४९...........५५७७०१...........४६२०१.६५
बागायत...........५४६८७...........७१९४४...........९२९६.७५
बहुवार्षिक फळपिके...........४६०५३...........५७४२०...........१०३६१.९६
-------------------