नासाकाच्या थकीत बिलांसाठी शेतकरी-कामगार आक्रमक
घावटे यांच्या कंपनीच्या राज्यातील कारखान्यांवर एल्गार मोर्चाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २ : आगामी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या (नासाका) मागील हंगामातील थकीत ऊस बिले अदा करावीत, या मागणीसाठी शेतकरी व कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे येथील उद्योजक प्रसाद घावटे यांच्या नेतृत्वाखालील ‘राजगंगा युनिट’ने नासाकाचा २०२५-२६ चा गाळप हंगाम चालविला होता. या हंगामातील शेतकरी व कामगारांची देणी अद्याप थकीत असल्याचा आरोप नासाका बचाव कृती समितीने केला आहे. थकीत रक्कम अदा न झाल्यास घावटे यांच्या कंपनीशी संबंधित राज्यातील इतर कारखान्यांवर शेतकरी-कामगारांचा एल्गार मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष विलास गायधनी यांनी दिला.
नासाकाच्या २०२५-२६ हंगामात सुमारे ६० हजार टन उसाचे गाळप झाले. प्रतिटन ३ हजार १ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे १८ कोटी रुपये ऊस बिलापोटी अदा होणे अपेक्षित होते. त्यापैकी सुमारे १४ कोटी रुपये अदा झाले असून, सुमारे चार कोटी रुपये अद्याप थकीत असल्याचा समितीचा दावा आहे. तसेच कामगारांचे सुमारे एक कोटी रुपयांचे वेतन थकीत असल्याचे सांगण्यात आले.
सुमारे १४ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने गेल्या सहा महिन्यांपासून कारखान्याचा वीजपुरवठा खंडित असल्याचा आरोप समितीने केला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भाडे व टेंगिंगपोटी सुमारे पाच कोटी ६८ लाख रुपयांची देणीही बाकी असल्याचे समितीने म्हटले आहे.
आरआरसीची कारवाई सुरू
थकीत ऊस बिलांबाबत शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आरआरसीची कारवाई सुरू झाल्याचे समितीने सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत दोन वेळा बैठक बोलावली होती. मात्र, या दोन्ही बैठकींना प्रसाद घावटे गैरहजर राहिले असून त्यांच्या वकिलांनी उपस्थिती लावल्याचे समितीचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचेही समितीने सांगितले.
शासकीय पातळीवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असली, तरी थकीत रकमेअभावी शेतकरी व कामगार आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे आगामी गाळप हंगाम सुरू होताना घावटे यांच्या कंपनीशी संबंधित राज्यातील इतर कारखान्यांवर मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला आहे.
इतर कारखान्यांतील शेतकऱ्यांना सावध करणार
नासाका शेतकरी व कामगारांची देणी थकीत राहिल्याने अशी परिस्थिती इतर कारखान्यांतील शेतकरी व कामगारांवर ओढवू नये, यासाठी संबंधित भागातील शेतकरी-कामगारांना जागृत करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले. घावटे यांच्या कंपनीला आगामी गाळप हंगामासाठी परवाना देण्यापूर्वी नासाकाची प्रलंबित देणी अदा करण्याबाबत साखर आयुक्तांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. थकीत रकमा अदा न झाल्यास संबंधित कारखान्यांवर तसेच कारखानदारांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष विलास गायधनी व शेतकऱ्यांनी दिला.