छायाचित्र : ६१२१७, १८, १९, २०, २१
सुरांची बरसात... महाराष्ट्र गीताचा जयघोष अन् कर्तृत्वाचा गौरव!
अवधूत गुप्तेंच्या स्वरांनी गोदाकाठ भारावला; ‘जय जय महाराष्ट्र माझा’वर तरुणाईचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १४ : गोदाकाठावर सुरांची मैफल रंगली होती... भक्तिगीतांचे सूर वातावरणात दरवळत होते... टाळ्यांचा कडकडाट आणि तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ‘गणाधीशा गणराया’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ अशा भक्तिमय गीतांनी सुरू झालेला हा स्वरप्रवास ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या जयघोषात परमोच्च बिंदूवर पोहोचला. प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजाने अवघा गोदाकाठ निनादला आणि नाशिक महोत्सव २०२६ ची सांगता अविस्मरणीय ठरली.
निमित्त होते जुने नाशिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित तीन दिवसीय नाशिक महोत्सवाचे. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागताची चाहूल देतानाच कुंभमेळ्याच्या नियोजनात योगदान देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता. १४) अवधूत गुप्ते यांच्या संगीत मैफलीने महोत्सवाचा समारोप झाला.
या सोहळ्याला केवळ संगीताचीच नव्हे, तर कर्तृत्वाच्या गौरवाचीही किनार लाभली. जुने नाशिकच्या मातीतून शिक्षण घेत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष सन्मान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकारी कविता नेरकर आणि आयएएस अधिकारी स्वप्निल पवार यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशामागील संस्कार आणि संघर्षालाही या माध्यमातून सलाम करण्यात आला. ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक गजानन शेलार यांना ‘लोकनेते पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
नव्या पिढीतील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित गायन स्पर्धेत ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात पियुष गायकवाड याने प्रथम, मयूरी राजपूत हिने द्वितीय, तर शीतल बेदाडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. नवोदित कलाकारांच्या सुरांनीही महोत्सवात वेगळी रंगत आणली.
महापौर हिमगौरी अडके-आहेर, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, नगरसेविका आदिती पांडे, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीत, संस्कृती, कर्तृत्वाचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर... अशा बहुरंगी आठवणींची शिदोरी देत नाशिक महोत्सवाने निरोप घेतला.